“दीड हजार देऊ सोबत अब्रुही वाचवू” – अजित पवारांचे शरद पवारांना उत्तर
मुंबई, १६ सप्टेंबर २०२४ : दीड हजार रुपये देण्यापेक्षा सरकारने बहिणींची अब्रु वाचवावी, असं म्हणत शरद पवार यांनी शिंदे सरकाराच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली. पवारांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. शंभर टक्के महिलांचे अब्रू वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करतोय त्याप्रमाणे आम्ही देखील करतोय. लाडकी बहीण योजना ग्रामीण भागात जास्त पॉप्युलर झालेली दिसते, असं अजित पवार म्हणाले.अजित पवार आज मुंबईत आहेत. त्यांनी लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होते.
एका महिलेने काही दिवसापूर्वी सांगितलं गँगरेप झाला, मात्र तपासाअंती समोर आलं की तसं काही झालं नव्हतं. मात्र अशावेळी पोलिसांची संस्थेची बारामतीची बदनामी झाली, त्यामुळे अशा घटना घडता कामा नये. तक्रार आल्यानंतर एसपी आणि संबंधित हे सगळ्या प्रशासनांना ताकद लावली. माझ्या सगळ्या नावाने कारण नसताना कोणालाही गोवण्याचा प्रयत्न करू नये, असं अजित पवार म्हणाले.
लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा एक दिवस पुण्याला गेलो होतो एक दिवस बारामतीला दर्शनासाठी गेलो होतो. आज मुंबईत लालबागचा राजा, चिंतामणी आणि सिद्धिविनायक दर्शन घ्यायला आलो आहे. माझा नेहमी कटाक्ष असतो गर्दीच्या वेळेला आपल्या दर्शनामुळे लोकांना त्रास नको. आज वर्किंग डे असल्यामुळे जास्त गर्दी नाहीये. बापाकडे काही मागितलं नाही. राज्यात सुख समाधान शांती भरभराट सर्वांची होऊ दे… प्रत्येकाची भावना असते सर्वांचं भले होऊ दे, असं साकडं बाप्पाकडे घातल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
राज्यात विधानसभेची निवडणूक कधी लागणार? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. तेव्हा मला काहीच माहिती नाही. निवडणूक आयोग ज्या वेळेला निवडणुका लावतील त्यावेळेला निवडणुका असतील. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. किती टप्प्यात घ्यावं हा देखील त्यांचा अधिकार आहे. निवडणूक आयोग ठरवेल तेव्हा निवडणूक होईल, असं अजित पवार म्हणाले.