अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे

मुंबई, ३ जुलै २०२३ : बहुसंख्य आमदार हे आमच्याबरोबर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आहेत. देशपातळीवर नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहोत. आम्ही ही भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच आहोत. प्रांताध्यक्ष या नात्याने सुनील तटकरेंची नेमणूक केलेली आहे. आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतो आहोत. असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसंच पत्रकार परिषदेत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

काहींनी आमच्या विरोधात सांगून नोटीस वगैरे काढली आहे तो अधिकार कुणालाही नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्याच बरोबर आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. या गोष्टी करत असताना आमच्याबरोबरच्या आमदारांचं भवितव्य कसं व्यवस्थित राहिल याची खबरदारी आम्ही घेत आहोत. कुणीही काहीही सांगितलं तरीही आमच्यावर कुठलीही कारवाई केली जाऊ शकत नाही. असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारचा फायदा अर्थात निधी, परवानग्या लागतात. केंद्र सरकार वेगळ्या विचारांचं आणि राज्य सरकार वेगळ्या विचारांचं असलं तर निधीच्या बाबतीत कमतरता राहते असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी सुनील तटकरे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.
शरद पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सुनील तटकरेंची नियुक्ती प्रफुल पटेल यांनी केली आहे. मी पण पक्ष स्थापन झाल्यापासून भुजबळांच्या नेतृत्वात काम केलं. काल मला जी माहिती मिळाली त्यात सुनील तटकरेंची नियुक्ती पटेल यांनी केली आहे. काही मान्यवरांची अशी वक्तव्यं आली की आम्ही कायदेशीर मार्गाने न जाता जनतेत जाऊ. पण रात्री बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन वेगळ्या घटना सांगण्यात येत आहेत. त्याला काही अर्थ नाही. आम्ही जी भूमिका घेतली आहे ती योग्य, चांगली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भल्याची आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप