दमदाटी करणं हाच अजित पवारांचा स्वभाव दोष आहे – जितेंद्र आव्हाड
ठाणे, २७ डिसेंबर २०२३: राज्यातील राजकारणी मंडळींना आता लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. आरोप प्रत्यारोपांचं राजकारण जोरात सुरू झालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शिरुर मतदारसंघात येत खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं होतं. शिरूरमध्ये पर्याय देणार आणि निवडूनही आणणार असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. दमदाटी करणं हाच अजित पवारांचा स्वभाव दोष आहे. शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ए गप्पे बस रे,उठू नको असं अजित पवार म्हणत होते. पण तुम्ही घरी नाहीत तर सार्वजनिक जीवनात आहात त्यामुळं अशी विधानं करणं योग्य नाही.
अजित पवार गट आणि शिंदे गटात जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे असे विचारल्यानंतर आव्हाड म्हणाले, दुसऱ्यांच्या घरात डोकवायचं नसतं. त्यांच्या घरात काय चाललंय. भांडण चालू आहे का. आम्हाला काय करायचंय. आम्ही आमचा संसार बघू. भाजप दोघांनाही घरचा रस्ता दाखवणार असे सांगत शिंदे आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार. पाडून दाखवतो म्हणणारी माणसं मोठी आहेत. ते कुणालाही पाडू शकतात. ४८ च्या ४८ जागा निवडून आणू शकतात, असा टोला आव्हाड यांनी लगावला.
अमोल कोल्हेंची शेतकरी आक्रोश यात्रा आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे अजित पवार आक्रमक झाले आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. यावर आव्हाड म्हणाले, प्रत्येकालाच घाबरवणं कुणलाही शक्य होत नाही. या जगात लोक यमालाही घाबरत नाहीत, तो कधीतरी येणारच. मग बाकीच्यांना काय घाबरायचं? असे आव्हाड म्हणाले.
दरम्यान, शिरुर मतदारसंघातील विद्यमान खासदाराने पाच वर्ष त्याच्या मतदारसंघात लक्ष दिले असते तर बरे झाले असते. दीड वर्षापूर्वी तो खासदार मला राजीनामा द्यायचा आहे, म्हणत माझ्याकडे आला होता. पण त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जीवाचे रान केले होते. त्यांना आणि मला खासगीत बोलवा. आता त्यांचे सगळे चाललेले आहे. पण मधल्या काळात ते सहाही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यांनी मला आणि त्यावेळेसच्या वरिष्ठांना सांगितले होते की, मी राजीनामा देत आहे, मी कलावंत आहे. माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. माझा सिनेमा चालला नाही.