राष्ट्रवादी काँग्रेस वर अजित पवार यांचा कब्जा; राज ठाकरे यांनी केली दादांवर टीका

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : गटासह त्यांनी महायुतीत प्रवेश केला. तसेच मूळ पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाचं दार ठोठावलं. निवडणूक आयोगाने याप्रकरणी मंगळवारी (६ फेब्रुवारी) निकाल दिला. या निकालानुसार अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यासह आयोगाने पक्षाचं चिन्हही अजित पवार गटाला बहाल केलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

निवडणूक आयोगाच्या या निकालावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसेने या निकालावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. मनसेने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्पं आहे. पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!

यापाठोपाठ मनसेने आणखी एक पोस्ट एक्सवर केली आहे. यामध्ये मनसेने अजित पवार यांच्या जुन्या भाषणाचा काही भाग शेअर केला आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत जो निकाल दिला. असाच काहीसा निर्णय काही महिन्यांपूर्वी शिवसेनेबाबतही दिला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. या निकालावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.

अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले होते, अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला आणि तो वाढवला, मुंबईच्या शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली आणि हा पक्ष महाराष्ट्राच्या सर्वदूर पोहोचवला. त्यांचाच पक्ष तुम्ही काढून घेतलात. त्यांचं चिन्ह काढून घेतलंत. निवडणूक आयोगाने जरी निर्णय दिला असला तरी हा निर्णय जनतेला पटलाय का, त्याचा विचार झाला पाहिजे. तुमच्यात धमक होती तर स्वतःचा काढा, तुम्हाला कोणी अडवलं होतं
यासह मनसेने म्हटलं आहे की, ‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? वाह रे पट्ठ्या!