महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार – अजित पवार
पुणे, २१ जुलै २०२४ : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कसबा विधानसभा मतदारसंघात पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीबरोबर, यावर स्पष्टीकरण दिले आहे.
मागील दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला या निवडणुका केव्हा होणार, असा प्रश्न पडला आहे. लोकसभा निवडणूक भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन लढवली. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीमधील तीनही पक्ष स्वतंत्र लढतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असताना. अजित पवार यांनी विधानसभा आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली आहे.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. त्यात अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन आपण आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार आहोत, पण त्यानंतर होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
भाजपमध्ये नाराजी
अजित पवार यांना महायुतीमध्ये घेऊन सत्तेत सामावून घेतल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातही टीक यावर भाष्य करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातच आता अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्वबळाचा नारा दिला आहे.