बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन शिंदे फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार फोडणार प्रचाराचा नारळ
मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४ : बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास नक्की झाली आहे. आपल्या बहिणीचा पराभव करण्यासाठी अजित पवार देखील कामाला लागले आहेत. यासाठी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यातून एकप्रकारे अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांना महाराष्ट्रातून सहानुभूती मिळत असल्याचे वातावरण आहे. राजकीय परिस्थिती लक्ष्यात घेऊन अजित पवार देखील लोकांना सहानुभूतीला बळी पडू नका असं वारंवार सांगू लागले आहेत. अजित पवार यांना राज्याचं मुख्यमंत्री पद हवं आहे. यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थित बारामतीची जागा जिंकून भाजप पक्षश्रेष्ठींना खुश करायचं आहे.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पवार कुटूंबाशिवाय दुसरा उमेदवार दिल्यास महायुतीला ही जागा जिंकणे अवघड होणार आहे. यासाठी अजित पवार यांनी आपल्या पत्नीलाच उमेदवारी देण्याचं निश्चित केलं आहे. लोकसभा निडवणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी बारामती रोजगार मेळावा आयोजित करुन तरुणांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आहे. सुनेत्रा पवार यांनीही मागील काही दिवसांपासून बारामतीतील दौरे वाढवले आहेत.
बारामती येथे होणाऱ्या रोजगार मेळाव्याबद्दल माहिती देताना अजित पवार यांनी सांगितले की पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील युवक-युवतींना रोजगार मिळवून देणाऱ्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच आयोजन 2 मार्चला बारामती येथे केलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत.
महारोजगार मेळाव्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात’नमो महारोजगार’ मेळाव्यासंदर्भात आढावा बैठक झाली.