संघाच्या बैठकीकडे अजित पवार गटाची पाठ, सत्ताधाऱ्यांसाठी आयोजित केली होती बैठक
नागपूर, १९ डिसेंबर २०२३: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांनी आज (मंगळवारी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘रेशीमबाग’ येथील स्मृतीमंदिराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. आपल्या पूर्वनियोजत कार्यक्रमांमुळे येऊ शकणार नसल्याचे अजितदादा आणि त्यांच्या गटातील आमदारांनी कालच कळविले होते. पण यामागे मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि टीका होऊ शकते ही शक्यता लक्षात घेत पाठ फिरविली असल्याचे बोलले जात आहे. शिवाय यातून “सत्तेत सोबत असलो तरी अजूनही आमची श्रद्धा गोविंदबागेवरच आहे”, असा अप्रत्यक्ष संदेश दिल्याचीही चर्चा आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक दिवंगत केशव बळीराम हेडगेवार यांना अभिवादन करण्यासाठी भाजपचे आमदार आणि खासदार संघ मुख्यालयात जातात. यंदा भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यावतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदारांनाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. यानुसार भाजप आणि शिवसेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी रेशीमबागेत हजेरी लावली. मात्र आपल्या पूर्वनियोजत कार्यक्रमांमुळे आपण येऊ शकणार नसल्याचे अजितदादा आणि त्यांच्या गटातील आमदारांनी कालच कळविले होते.
दरम्यान, यावेळी भाजपच्या आणि सेनेच्या आमदारांना संघाकडून आगामी निवडणुका आणि दोन वर्षांत होणारी संघाची शताब्दी या विषयांवर कानमंत्र दिले. यात आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता जातीगत विषमता राहू नये. संपूर्ण देश, संपूर्ण देशाची जनता ही समरसतेने रहावी. असा एक सामाजिक समरसतेचा संदेश देण्यात आला. दुसरा संदेश म्हणजे, आपल्या देशाची जी कुटुंब पद्धती जी जगामध्ये अतिशय कौतुकास्पद अशी आहे. पण ती कुटुंब पद्धती ऱ्हास होताना दिसत आहे. त्या भारतीय कुटुंब पद्धतीचा पुन्हा विकास व्हावा. तिसरा पर्यावरणाचा संतुलनाचा संदेश देश्यात आला. चौथा आत्मनिर्भर भारत व्हावा या दृष्टीने आपली काही कर्तव्य आहेत ते आपण केलं पाहिजे. स्वदेशी स्वतंत्र विकसित व्हावे. तर पाचवे म्हणजे आपण नागरी कर्तव्याचे पालन केले पाहिजे असे संदेश देण्यात आले.
जात आधारित जनगणनेची गरज नाही : संघाची भूमिका
जात आधारित जनगणनेची गरज नाही. कारण एकीकडे आम्ही जातीचा उहापोह करणार, जातीनिहाय गणना करणार आणि दुसरीकडे म्हणणार की जातिभेद नष्ट बस झाला पाहिजे. जर जात विस्मरणात जात असेल विस्मरणात जाऊ द्या. कारण जात ही कोणी निर्माण करत नाही ते जन्मापासून माणसाला मिळत असते. त्याच्यामुळे तिचा मोजदाद करणे आणि मग त्याच्यावरून भांडण निर्माण करणे, देश कमजोर करणे हे काही योग्य नाही. जातीचा विचार पण संघ करत नाही. म्हणून संघाची जातीय जनगणनेची गरज नाही, अशी भूमिका आहे. लोकप्रतिनिधींकडूनही अशी मागणी होऊ नये अशी अपेक्षा आहे, असे मत विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगीळ यांनी व्यक्त केली.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप