कोश्यारींनी पदावर राहण्यावर पुनर्विचार कराना – अजित पवार संतापले
मुंबई, २० नोव्हेंबर २०२२: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यात उमटायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेने राज्यपालांचा या विधानाचा निषेध केला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टि्वट करुन राज्यपालांना चांगलेच सुनावले आहे.”महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही मा. राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे,” असे अजित पवारांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
“महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील,” असे पवार यांनी म्हटलं आहे.
“राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे.राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, ही प्रार्थना,” असा टोमणा त्यांनी हाणला आहे.
शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. राज्यपालांच्याविरूद्ध आंदोलनकर्ते आक्रमक होतांना दिसत आहेत. यावरुन आता मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरला आहे.
मुंबई विमानतळ येथे मराठा क्रांती मोर्च्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्यापालांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस, शिवप्रेमी संघटना आता रस्त्यावर उतरल्या आहेत. यावरुनच आता संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढा असं म्हटलं आहे.