महायुतीत अजित पवारांना स्वतंत्र लढायला सांगतिल: जयंत पाटील यांचा मोठा दावा
पुणे, ९ सप्टेंबर २०२४ः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. महायुतीत जागावाटपावरुन चर्चा सुरु आहे. या जागावाटपाबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या जागावाटपावरुन महायुतीत काही ठिकाणी धुसफूस असल्याचं याआधी समोर आलं आहे. तर जयंत पाटील यांनी आज वेगळाच दावा केला आहे. जयंत पाटील यांनी अजित पवार गटाबाबत मोठा दावा केला आहे. “महायुतीमध्ये अजित पवार यांना तात्पुरतं स्वतंत्र लढायला सांगतिल”, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. “वेगळं लढा, मग निवडणुका झाल्यावर एकत्र या, असं अजित पवारांना सांगितलं जाऊ शकतं”, असा दावा जयंत पाटील यांनी केलाय.
पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
“कदाचित माझी अशी शंका आहे की, त्यांना सांगतील की, तुम्ही दादा तात्पुरते स्वतंत्र लढा. नंतर आपण सरकारमध्ये एकत्र येऊ, असंही ते करतील. तुम्ही तिकडे लढा. लांब उभे राहा. मग निवडणुका झाल्यावर आपण एकच आहोत. आपण मित्रच आहोत, असं कदाचित समजूत घालतील. अजित पवार गट महायुतीत कुणाबरोबरही राहिलं त्यांचं नुकसान आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
“शरद पवार यांची भूमिका त्यागाचीच राहिली आहे. महाविकास आघाडी एकसंघ राहायला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आमचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटतंय हे खरं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले. “निवडणुका पुढे ढकलण्याचे षडयंत्र सुरू आहे. सरकारला लाडकी खुर्ची महत्त्वाची आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होतील की नाही? हा प्रश्न आहे. असं असताना केवळ ४-६ महिन्यांच्या विचार सुरू आहे”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
‘सरसकट वाटप फक्त निवडणुकीपुरतेच’
“पैशांची गरज कुणाला जास्त आहे हे सरकारने ओळखलं पाहिजे. सरसकट वाटप फक्त निवडणुकीपुरतेच आहे, असं सत्ताधारी पक्षाचेच आमदार सांगतात. आम्ही सत्तेत आल्यास ज्यांना गरज आहे त्यांनाच मदत देऊ. त्यांना कदाचित वाढवून देऊ”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.
‘सांगलीत कोणी कुणाचा कार्यक्रम केला नाही’
“सांगलीचा विषयावर पांघरून पडलेलं आहे. तो आता काढण्याची गरज नाही. सांगलीतील दोन्ही तरुण मुलं चांगली आहेत. त्यांच्या वडिलांबरोबर मी काम केलेलं आहे. मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्यावेळी गैरसमज झाले होते. आता दुरुस्ती झालेली आहे. सांगलीत कोणी कुणाचा कार्यक्रम केला नाही. परिस्थितीच तशी निर्माण झाली”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.