पुणे: फडणवीस यांनी दम भरल्यानंतर एमआयडीसीतील खंडणीखोरावर गुन्हा दाखल
पुणे, २५ जानेवारी २०२३: एमआयडीसीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी कंपन्यांना धमकविणाऱ्या खंडणी पोरांचा बंदोबस्त करा अन्यथा मी तुमच्यावर कारवाई करेल असा दम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांना भरला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी आता थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कामगार वाहतुकीचे बसचे कॉन्ट्रॅक्ट मलाच द्या असे सांगून धमकविणाऱ्यावर महाळुंगे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे फडणवीसंच्या इशारा नंतर पोलिसांनी ही पहिलीच केस केली आहे.
रविंद्र गाढवे ( रा. सावरदरी, तालुका खेड, जिल्हा पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश अर्जुन पेटकर (वय ३६ वर्ष, राहणार सिद्धेश्वर पार्क पिंपळे सौदागर पुणे) यांनी या संदर्भात फिर्यादित दिली आहे. हा खंडणी मागण्याचा प्रकार ऑगस्ट महिन्यापासून सुरू होता अखेर पेटकर यांनी तक्रार दिल्यानंतर आज महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावरदरी येथील स्पार्क मिंडा या कंपनीत
फिर्यादी पेटकर हे एचआर मॅनेजर म्हणून काम करत आहेत. स्पार्क मिंडा ही कंपनी आरोपी गाढवे यांच्या जागेत उभी करण्यात आलेली आहे. त्यामुळे गाढवे याने त्याच्या ग्लोबल आयकॉन कंपनीला स्पार्क मिंडा कंपनीमध्ये कामगारांचे वाहतुकीचे बस कॉन्ट्रॅक्ट मिळावे यासाठी कंपनीचे कामगार वाहतुकीचे बस अडवणूक करत होता. तसेच कंपनी प्रशासनावर दबाव आणत आहे. फडणवीस यांनी जाहीर आवाहन केल्यानंतर याबाबत कंपनीमध्ये चर्चा होऊन अखेर गाढवे यांच्या विरोधात तक्रार देण्याची तयारी दाखविण्यात आली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कंपनीचे कामगार वाहतुकीचे बस कॉन्ट्रॅक्ट मिळावे म्हणून बस अडवून कॉन्ट्रॅक्ट मागणी करणारे व्यक्तीविरुद्ध आयपीसी ३८४, ३४१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे म्हणाले , महाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कंपनी प्रतिनिधी यांना कंपनीतील कामकाज मिळविण्याकरिता कोणी व्यक्ती जबरदस्तीने, धमकी देऊन, कॉन्ट्रॅक्ट मागणी करीत असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास द्यावी. पोलीस प्रशासन हे कंपनी प्रशासनास सदैव मदतीस तयार आहे.
पोलिस आयुक्तांनी दिला होता आदेश
देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची बैठक घेऊन त्यांना खंडणीखोरांचा बंदोबस्त करा असे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनी प्रशासन यांची बैठक घेऊन कंपन्यांमधील काम मिळवणे करिता कोणी व्यक्ती अडवणूक करून, धमकी देऊन, काम मागणी करीत असल्यास तात्काळ माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे आवाहन करण्यात आले होते.