राजीनाट्यानंतर वसंत मोरेंनी घेतली पुन्हा एकदा पवारांची भेट
पुणे, 14 मार्च 2024 : मनसेतील अंतर्गत राजकारणामुळे राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा गुरुवारी (ता.१४) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. माझा पक्षप्रवेश नसून मी शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांना भेटायला आलो आहे. मी काही लपवणार नसून शरद पवारांनी बोलावलं म्हणून मी आल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.
मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते पुढे काय करणार ? कोणत्या पक्षात प्रवेश करणार ? अशी चर्चा सुरु होती. अशातच मोरे यांनी गुरुवारी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली. यापुर्वी त्यांनी निसर्ग मंगल कार्यालयात पक्षाच्या बैठकीपुर्वी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. तेव्हा प्रभागातील कात्रज दुध डेअरीजवळील क्रिडांगणाच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती, असे उत्तर मोरे यांनी दिले होते.
गुरुवारी देखील मोरे यांनी मी माझ्या प्रभागातील काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आलो होतो. साहेबांनी मला बोलाविले होते, असे नमूद केले. मोरे यांचा प्रभाग हा शिरुर लोकसभा अािण बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. या भागात मोरे यांचा जनसंपर्क चांगला आहे. याचा फायदा खासदार सुप्रिया सुळे, तसेच खासदार कोल्हे यांनना होऊ शकतो, या अनुषंगाने मोरे यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात आहे.
शरद पवार यांच्या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले, माझा पक्षप्रवेश नाही. मी खासदार अमोल कोल्हे आणि शरद पवार यांना भेटायला आलो आहे. मी काही लपवणार नाही. आता निवडणुका आहेत. मी निवडणूक लढवू इच्छूक आहे. शरद पवारांनी बोलावलं म्हणून मी आलो. पुणे लोकसभा मतदारसंघाची सध्याची स्थिती काय आहे, याबाबत मी शरद पवारसाहेबांना माहिती दिली. त्यांना सर्व परिस्थिती माहीत आहे. मी उभा राहिल्यास कसा निवडून येऊ शकतो, याबाबतची माहिती मी त्यांना दिली. तसंच जयंत पाटील यांनी काही गोष्टी लेखी स्वरुपात मागवल्या होत्या. त्या मी आज दिल्या आहेत. मी लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. विचार करून आणि कार्यकर्त्यांशी बोलून राजकीय निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.