बंडखोर शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्राचे शक्तिप्रदर्शन जोरात
मुंबई, ३१/०७/२०२२: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या निमीत्ताने समर्थनाचे प्रतिज्ञापत्र आणावे असे आवाहन शिवसैनिकांना केले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही याच दिशेने पाउल टाकत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरु केली आहे. ठाण्यातून त्यांच्या समर्थनासाठी प्रतिज्ञापत्र भरुन घेण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून या मोहीमेची सर्व सुत्र ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे वास्तव्य असलेल्या टेंभी नाका येथील आनंद मठातून यासंबंधीचे नियोजन केले जात असून संपूर्ण जिल्ह्यात यासाठीचे अर्ज वितरीत केले जात आहेत.
राज्यभरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करत शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून नव्या नियुक्त्यांचा सपाटा लावला आहे. ठाणे जिल्ह्यातही शिंदे समर्थकांना पदावरुन दुर करत शिवसेना भवनातून नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात अजूनही उद्धव ठाकरे यांना नवा नेता सापडलेला नाही. त्यामुळे नरेश म्हस्के यांच्या जागी नव्या जिल्हा प्रमुखाची नियुक्ती अजूनही शिवसेनेकडून करण्यात आलेली नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र सुभाष भोईर यांच्याकडे संपर्कप्रमुख पद तर सदानंद थरवळ या जुन्या जाणत्या शिवसैनिकाकडे जिल्हाप्रमुख पद सोपविण्यात आले आहे. याशिवाय याच भागात काही शहरप्रमुखांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईत पक्षातील ३३ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर केला असला तरी ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघातील जिल्हाप्रमुख मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे तेथे नव्या नियुक्त्यांची कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.