इडीच्या चौकशीनंतर जयंत पाटील म्हणाले दादांचा फोन आला नाही, त्यावर अजित पवारांनी दिले उत्तर

मुंबई, २३ मे २०२३: इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अ‍ॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची काल (२२ मे) तब्बल साडेनऊ तास ईडी चौकशी झाली. ईडीने समन्स बजावल्यापासून चौकशी होईपर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. परंतु, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी याप्रकरणी भाष्य करणं टाळलं होतं. सगळ्यांचे फोन आले पण अजित पवारांचा फोन आला नाही असे म्हणत पाटील यांनीही त्यांची नाराजी व्यक्त केली होती. अखेर याप्रकरणावरील मौन अजित पवारांनी सोडलं असून जयंत पाटलांच्या चौकशीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

ईडी चौकशीनंतर अजित पवारांनी फोन केला नसल्याची माहिती जयंत पाटलांनी स्वतः दिली. याबाबत अजित पवार म्हणाले, “वेगवेगळ्या केंद्रीय आणि राज्यस्तरावरील यंत्रणा असतात. वेगवगेळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार या यंत्रणांना असतो. या यंत्रणांनी चौकशीला बोलावल्यानंतर नेतेमंडळी पूर्णपणे सहकार्य करतात. जयंतराव पाटलांना साडेनऊला सोडल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट आपण पाहिलंय. आता याबद्दल दबक्या आवाजात भूमिका घेतात.”

“मुंबईच्या अधिवेशनात वरच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काय सांगितलं हे रेकॉर्डमध्ये आलंय. काँग्रेसमध्ये अनेक वर्ष मंत्रिपद उपभोगलेले मंत्री भाजपामध्ये गेल्यावर एका कार्यक्रमात त्यांनी जाहीर केलं होतं की इकडे आलोय, काही त्रास नाही, व्यवस्थित झोप येते आम्ही बिंधास्त आहोत. तीच गोष्ट सांगली जिल्ह्यात खासदारांनी सांगितली. केंद्रीय राज्यमंत्र्यांनीही स्टेटमेंट केलंय आम्ही स्वच्छ करतो, निरमामध्ये घालतो वगैरे. वास्तविक एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून अशी स्टेटमेंट येतात. चौकशीला बोलावल्यानंतर काही घाबरण्याचं कारण नाही. काहींनी पूर्वीची उदाहरणे दिली की युपीए सरकार असताना मोदी आणि शाहा यांनाही कसं बोलावलं होतं वगैरे. परंतु, द्वेष भावनेतून, राजकीय सुडबुद्धीने कोणाला बोलावण्यात येऊ नये. काही क्लू मिळाला, तर नोटीस काढण्याचा त्यांचा अधिकार आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

जयंत पाटलांची ईडी चौकशी हा राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. त्यांच्या चौकशीबाबत राज्यातील वरीष्ठ नेते मौन असल्याचंही बोललं जात असताना जयंत पाटील यांनी मात्र सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “कुणाचं एकाचं नाव राहिलं, तर चूक होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन आले असं मी सांगितलं. आमच्या वेगवेगळ्या पक्षातील सर्वच मित्रांचे फोन आले. आज सकाळीही फोन आले”, असं जयंत पाटील म्हणाले.

एकीकडे जयंत पाटील यांनी “कुणा एका नेत्याचं नाव घेतलं नाही तर चूक होईल, म्हणून सगळ्यांनी फोन केले असं मी सांगतोय” असं म्हणाले. पण दुसरीकडे त्यांनी अजित पवारांचा मात्र स्वतंत्र उल्लेख केला. माध्यमांनी अजित पवारांचा फोन आला होता का? असा प्रश्न केला असता “त्यांचा फोन आलेला नाही”, असं जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. त्यामुळे या दोघांमधल्या नाराजीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.