तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर मोदींच्या हस्ते मुंबईत ३० हजार कोटींच्या कामाचा धडाका

मुंबई, १३ जुलै २०२४ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आज ते पहिल्यांदा मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मुंबईतील ३० हजार कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मुंबईला जागतिक स्तरावर थिंक टँक बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सुरुवात केली. ते म्हणाले, आज मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी तीस हजार कोटींच्या प्रकल्पासाठी भूमिपूजन आणि लोकार्पणाची संधी मिळाली. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल. यात रोड आणि रेल्वेव्यतिरिक्त महाराष्ट्रातील नवतरुणांना कौशल विकासासाठी खूप मोठी योजनाही समाविष्ट आहे. यातून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल. गेल्या एक महिन्यापासून मुंबई देश विदेश गुंतवणुकांच्या उत्सवाची साक्षीदार बनली आहे. लहान मोठ्या गुंवणूकदारांनी आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मचं उत्साहाने स्वागत केलं आहे. लोकांना माहीत आहे की एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकेल. स्थायित्व देऊ शकतं. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी म्हटलं होतं की तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तिप्पट वेगाने काम करणार आहे. आणि आज आम्ही हे होताना पाहु शकतोय, असं या कार्यक्रमात मोदी म्हणाले.

महायुती सरकारचं हेच लक्ष्य आहे. २१ व्या शतकात भारताच्या आकांक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी उत्तम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत कोस्टल रोड आणि अटल सेतू आता पूर्ण झाले आहेत. तुम्हाला आठवत असेल की अटल सेतू तयार होत होतं, तेव्हा याविरोधात अनेक गोष्टी पसरवल्या गेल्या. परंतु, याच अटल सेतूचा आता प्रचंड फायदा होत आहे, असंही मोदी म्हणाले.

महाराष्ट्राकडे समृद्ध भविष्याची स्वप्ने आहेत
“महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आहे, महाराष्ट्राकडे समृद्ध भविष्याची स्वप्ने आहेत. महाराष्ट्र हे ते ज्याकडे उद्योगांची पॉवर आहे, शेतीची पॉवर आहे, फायनान्स सेक्टरची पॉवर आहे. याच पॉवरने मुंबईला देशाचं फायनान्सचं हब बनवलं आहे. महाराष्ट्राच्या याच पॉवरने महाराष्ट्राला आर्थिक पॉवर हाऊस बनवायचं. माझं लक्ष्य आहे की मुंबईला जगाचं थिंक टँक कॅपिटल बनवणार. महाराष्ट्र टुरिझममध्ये भारतातील नंबर वन राज्य बनेल”, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.