आयोध्येनंतर आता मथुरा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पुणे, ११ फेब्रुवारी २०२४: ‘‘ अयोध्येत श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली. एक इच्छा पूर्ण झाली. परंतु श्रीरामाबरोबरच भगवान श्रीकृष्णाची प्रतिष्ठापना होत नाही, तोपर्यंत आमचे कार्य सुरू राहणार आहे,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोध्येनंतर मथुरेचा मुद्याला हात घातला.
स्वामी गोविंददेव गिरीमहाराज यांच्या अमृत महोत्सवनिमित्त आळंदी येथे आयोजित ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी भेट देऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांनी मथुरेच्या मुद्याला हात घेतला. फडणवीस म्हणाले,‘‘ अयोध्येत राममंदिराचे काम आम्ही सांगितले असते, तर चार ते पाच लोकांनीच केले असते. परंतु राममंदिर न्यासाने लोकांच्या सहभागातून मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. तेव्हा करोडो लोकांनी मुक्त हस्ते दान केले. सरकारच्या एकाही पैसा न घेता राममंदिराची उभारणी झाली, रामललाची ही प्रतिष्ठापना झाली.त्याचा विशेष आनंद होतो.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘ तुमची एक इच्छा पूर्ण झाली. परंतु प्रभू श्रीरामचंद्राबरोबरच जोपर्यंत भगवान श्रीकृष्णाची प्रतिष्ठापना होत नाही, तोपर्यंत आम्ही आराम करणार नाही. ते कार्य सुरूच राहणार आहे. काशी विश्वनाथ बाबाने तर चमत्कार दाखवून दिला आहे. आता त्याची चिंता आम्हाला नाही. पुन्हा एकदा सनातन हिंदू संस्कृतीला उंचीवर नेण्यासाठी आणि ती स्थापित करण्यासाठी जो महायज्ञ सुरू आहे. त्यामध्ये गोविंददेव गिरीमहाराज समिधाच्या रूपाने त्यासाठी आपले कार्य सुरू ठेवतील.’’
तर कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना फडणीस म्हणाले,‘ आम्हाला विश्वास आहे, कायदेशीर मार्गाने आणि सौद्यार्हपूर्ण वातावरणात मथुरेचा प्रश्न सुटेल. काशी विश्वनाथ कॅरिडोअरच्या माध्यमातून जे काम सुरू आहे. ते पाहता देशात चांगले वातावरण आहे.’
कोण राऊत
शिवसेना नेते (उबाठा) संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता,‘ कोण संजय राऊत, ते कोणी मोठे नेते आहेत का. त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारात जाऊ नका.’’ तर राममंदिराच्या मुद्यावरून फडणवीस यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसवर टीका केली.