मुंबई महापालिकेतील १७०० कोटीची कामे बदलल्याने आदित्य ठाकरे संतप्त ; आयुक्तांवर केली टीका

मुंबई, ५ जानेवारी २०२३: मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने १७०० कोटींची कामे मंजूर केली होती. मात्र ही कामे आयुक्तांनी परस्पर बदलली. ही कामं आयुक्त अशी बदलू शकतात का? , अशी टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केली.
आदित्य ठाकरे यांनी आज अंधेरी पूर्व येथील गुंदवली शाळेतील ज्युनियर-सिनियर केजीच्या वर्गाच्या नूतनीकरणाचं आज उद्घाटन केलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवत निवडणुका घेण्याचं खुलं आव्हान दिलं. महापालिकेच्या निवडणुका घ्या, तसंच विधानसभेच्या निवडणुका घ्या; पण यांच्यात निवडणुका घेण्याची हिंमत नाहीये, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, नवीन वर्षात तरी या गद्दार सरकारने ४० गद्दार आमदारांच्या आणि १३ खासदारांच्या जागी निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी. पुढे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. बेकायदेशीर मुख्यमंत्री स्वतःच्या कामासाठी दिल्लीत जातात, गुवाहाटीला जातात; पण राज्यासाठी कधी गेले नाहीत. पुढे आदित्य ठाकरे यांनी खोचक टोला देखील लगावला. आपल्याकडे एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम आहेत, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.