उमेदवारी अर्ज न भरल्याने सुधीर तांबेवर होणार कारवाई ?

नाशिक, १२ जानेवारी २०२३ : नाशिक पदवीधर मतदार संघासाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. कॉंग्रेस पक्षाने एबी फॉर्म देखील सुधीर तांबे यांनाच दिला होता. त्यामुळे कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर तांबे हेच असणार हे जवळपास निश्चित झाले होते. तर भाजपकडूनही सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सत्यजित तांबे हे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे तांबे पिता-पुत्र हे भाजपमध्ये गेल्यास बाळासाहेब थोरात यांच्यासह कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असला असता. त्यामुळे भाजपनेही शेवटपर्यंत यामध्ये उमेदवार घोषित केलेला नाही. याच दरम्यान मात्र सुधीर तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, उलट मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला आहे. त्यामुळे सुधीर तांबे यांनी पक्षाच्या आदेश पाळला नाही म्हणून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. अखेरच्या क्षणी सुधीर तांबे यांनी ही भूमिका घेतल्याने कॉंग्रेसची मोठी अडचण झाली आहे.

तर दुसरींकडे काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांना एका कार्यक्रमात सत्यजित तांबे यांना बाहेर काढा आणि नाहीतर आमचं लक्ष आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे सत्यजित तांबे यांना ऑफर दिली होती, मात्र ती अपक्ष उमेदवारी करून सत्यजित तांबे यांनी ती ऑफर स्वीकारल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तर दुसरीकडे मुलासाठी वडिलांना कॉंग्रेस पक्षाची शिस्तभंगाची कारवाई अंगावर घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांना नाराज न करता सत्यजित तांबे यांनी फडणवीस यांच्या जवळ गेल्याचे बोलले जात आहे.

कॉंग्रेस पक्ष आता सुधीर तांबे यांच्याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष असले तरी दुसरीकडे सत्यजित तांबे यांची अपक्ष उमेदवारी म्हणजे भाजपची छुपी युती असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.