शिंदे गटाला धक्का; शिवाजी पार्कवर आव्वाज ठाकरेंचाच !

मुंबई, २३ सप्टेंबर २०२२: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन (Shivsena Dasara Melava 2022) वाद पेटला आहे. याबाबत शिवसेनेने उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

महापालिकेचे वकील मिलिंद साठ्ये यांनी यावेळी जोरदार युक्तीवाद केला. त्यांनी शिवसेनेच्या जुन्या दाव्याबाबतची माहिती न्यायालयात दिली.

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडून महापालिकेला अर्ज करण्यात आला आहे, पण महापालिकेने ठाकरे गट-शिंदे गट यांना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास नकार दिला आहे.

याबाबतचे पत्र महापालिकेने दोन्ही गटाला दिले आहे. महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली. आज ठाकरे गट, शिंदे गट, महापालिका यांच्याकडून बाजू मांडण्यात आली. पालिकेच्या वकीलांनी शिवसेनेचे यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे युक्तिवाद केला, त्यामुळे शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा अधिकार शिवसेनेने गमावला आहे, असे पालिकेचे वकील मिलिंद साठ्ये यांनी सांगितले.

शिवसेना व शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी यांनी अॅड. जोएल कार्लोस यांच्या माध्यमातून काल ( गुरुवारी) रिट याचिका दाखल केली होती. महापालिका आयुक्त व जी-उत्तर प्रभागाचे सहायक आयुक्त यांना प्रतिवादी आहेत. शिवसेनेची याचिका आल्यावर याचिकेतील प्राथमिक माहिती पाहून या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेवर ज्येष्ठ वकील एसपी चिनॉय यांनी शिवसेनेची बाजू मांडली.

सुनावणीत काय झाले..
एका आमदाराला पोलिस आवरु शकत नाही, असा उल्लेख शिवसेनेच्या वकीलांकडून सदा सरवणकर यांचे नाव न घेता कोर्टात केला. परवानगी न देण्यासाठी चालढकल सुरु आहे, असा आरोप शिवसेनेने केला. शिंदे गटाची याचिका फेटाळून लावा, असे शिवसेनेने सांगितले.

“शिवाजी पार्क या शांतता झोन आहे, हे खेळासाठीचे मैदान आहे. दोन्ही गटाला मैदान मिळविण्याचा अधिकार नाही, असा युक्तीवाद मुंबई महापालिकेचे वकील मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयात केला. आलेल्या अर्जावर मैदान न देण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे साठ्ये यांनी सांगितले. दोम्ही गटाला अर्ज करण्याचा अधिकार नाही. मैदानाची परवानगी नाकारल्याने कुणाच्याही अधिकाऱ्यांचं उल्लंघन केलेलं नाही, असे साठ्ये यांनी सांगितले.

शांततेसाठी लोक मैदानात जमू शकतात, रॅली, घोषणाबाजी, आंदोलनासाठी हे मैदान नाही, असे साठ्ये यांनी स्पष्ट केले आहे. हीच जागा हवी, असा अधिकार कुणालाही गाजवता येणार नाही. कुणीही एक जण आपला कायमचा अधिकार सांगू शकत नाही, असे साठ्ये यांनी स्पष्ट केले आहे.
दसरा मेळावा ही परंपरा म्हणता येईल, मात्र अधिकार नाही.२०१२मध्ये एमएमआरडीएच्या मैदानावर शिवसेनेने मेळावा घेतला होता, शिवाजी पार्क उपलब्ध नसेल तर आम्ही अन्य जागेचा विचार करु, असे शिवसेनेने म्हटलं आहे, दरवर्षी आम्ही अर्ज देऊ असेही तेव्हा म्हटलं होते.

२०१६चा सरकारी आदेश शिवसेनेकडून न्यायालयात सादर करण्यात आला. त्यावेळी दिलेल्या परवानगीचे दस्तावेज यावेळी सादर करण्यात आले. ‘आता कोरोना नाही, म्हणून आम्हाला परवानगी द्या,’ असा युक्तीवाद शिवसेनेकडून करण्यात आला. १९६६पासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यात येतो, असे न्यायालयात सांगण्यात आले.
मुळ शिवसेना कुणाची हा मुद्या येथे नाही,दरवर्षी शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर होतो, ही परंपरा थांबवणे योग्य नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. यापूर्वीही मनसेने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची मागणी केली होती, आम्ही पहिला अर्ज केला आहे. सदा सरवणकर यांनी नंतर अर्ज केला आहे, आम्ही २२ आणि २६ आँगस्टला अर्ज केला आहे, ३० आँगस्टला सरवणकर यांनी अर्ज केला आहे. अचानक कुणी अर्ज केला तर तो अयोग्य आहे. आजपर्यंत कायदा सुव्यवस्था निर्माण झाली नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. ‘शिवाजी पार्क मैदानासाठी कुणीही अर्ज करु शकते ना,’ असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे.
आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटाने केला आहे. सदा सरवणकर हे स्थानिक आमदार आहेत. दरवर्षी सरवणकरांनी अर्ज केला आहे. त्यांनी परवानगी मागितली आहे. स्थानिक आमदाराने अर्ज करणे व्यवहार्य आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सरवणकरांनी अर्ज केला आहे. २०१३-२०१४ सारखी परिस्थिती सध्या नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. सरवणकर हे शिवसेनेत आहेत. हे शिवसेनेचे सरकार आहे. सरवणकर हे शिवसेनेत नाही, असे अनिल देसाई यांना कसे म्हणता येईल. सरवणकर यांनी शिवसेना सोडलेली नाही. आम्ही शिवसेना म्हणून अर्ज करीत आहोत, असे शिंदे गटाच्या वकीलांनी म्हटलं आहे.
मी शिवसेनेत आहे, पक्षाचा आमदार म्हणून मी अर्ज करीत आहेत, असे सरवणकरांनी अर्जात म्हटलं आहे. पक्षाच्या विरोधात अनिल देसाईंनी अर्ज केला आहे.अनिल देसाई हे पक्षापेक्षा मोठे नाही, असे शिंदे गटाच्यावतीने वकीलांनी सांगितले.
तुम्हाला बीकेसीमध्ये परवानगी कशी मिळाली, हे पाहावं लागेल, असे न्यायालयाचे शिंदे गटाच्या वकीलांना सांगितले. बीकेसीची परवानगी आम्हाला आमच्या अर्जावर मिळाली, असे शिंदे गटाच्या वकीलांनी सांगितले. आम्ही सुप्रीम कोर्टाबाबत बोलत नाही, असे शिंदे गटाने स्पष्ट केले आहे. ‘तु्म्ही पालिकेच्या निर्णयाला आव्हान दिले आहे का?” असे कोर्टाने विचारता असता शिंदे गटाने सांगितले की, होय आम्ही महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

पालिकाना निर्णय योग्य आहे. अर्ज नाकारण्याचा अधिकार महापालिका आहे. हा निर्णय योग्य आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांच्या अहवालावरुन पालिकेने परवानगी नाकारली आहे. दोघांनाही परवानगी नाकारुन पालिकेनं योग्य केले. पालिकेनं जु्न्या निकालाबाबत आपलं निरीक्षण नोंदवले आहे. खरी शिवसेना कोण, यात आम्हाला जायचं नाही. दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क याबाबतची सुनावणी आहे. पालिकेचा निर्णय अंतिम नाही. मुंबई महापालिकेचा निर्णय तथ्यात्मक नाही. पालिकेचा निर्णय प्रमाणित नाही. मुंबई पालिकेचा वस्तूस्थितीची जाणीव आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देऊन पालिका अर्ज फेटाळू शकत नाही.