संभाजी भिडेंचा गुरुजी असा उल्लेख केल्याने फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण मध्ये खडाजंगी
मुंबई, २ ऑगस्ट २०२३: शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद चालू आहे. यावरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना परखड शब्दांत जाब विचारल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेत यासंदर्भात चर्चा चालू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन सादर केलं. यात संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल झाला असून योग्य ती कारवाई केली जाईल, असं फडणवीस म्हणाले. मात्र, यावेळी फडणवीसांनी संभाजी भिडेंचा ‘गुरुजी’ असा उल्लेख केल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावरून देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये खडाजंगी झाली.
विधानसभेत विरोधकांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली असता फडणवीसांनी निवेदन केलं. अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमरावती पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यानुसार चौकशी होईल. अमरावतीतील सभेचे व्हिडीओ उपलब्ध नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. माध्यमात जे व्हायरल होतंय, त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्यात येतील, असं अमरावती पोलिसांनी सांगितलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, संभाजी भिडेंचा उल्लेख ‘गुरुजी’ करण्यावरून विरोधक आक्रमक होताच फडणवीसांनी “आम्हाला ते संभाजी भिडे गुरुजी वाटतात. त्यांचं नावच गुरुजी आहे”, असं फडणवीस म्हणाले.
संभाजी भिडेंचा उल्लेख ‘गुरुजी’ करण्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की महाराष्ट्रात, देशात कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव जो कुणी निर्माण करेल, त्याच्याविरोधात सरकार कारवाई करेल. अमरावतीला जे काही घडलं, तिथेही धार्मिक तणाव निर्माण करण्याचा जाणून बुजून प्रयत्न चालला होता. त्यावर तुम्ही कारवाई केली. पण तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोलताना दुसरं महत्त्वाचं वाक्य उच्चारलं की महिमामंडन कुणी करू नये. तुम्ही त्या माणसाला गुरुजी म्हणत आहात. काही पुरावा आहे का तुमच्याकडे?” असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
“गुरुजी म्हणायला माझी काही हरकत नाही. तुमच्याकडे पुरावा आहे का? तो माणूस फर्ग्युसन कॉलेजमध्ये पीएचडी आहे, प्राध्यापक होतो असं सांगतोय. त्याची संस्था नोंदणीकृत आहे का? त्याचे अहवाल दिलेत का? जमाखर्च दिला आहे का? हे महिमामंडन नाही का?” अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाणांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रश्नांवर फडणवीस संतप्त झाले आणि त्यांनी चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं. “त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे. आता बाबा कसं आलं याचा मी पुरावा मागू का? असा पुरावा मागता येतो का? त्यांचं नावच गुरुजी आहे. हे मतांचं राजकारण चालू आहे. ही मतांची बेगमी आहे.या देशातल्या कोणत्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही. कुणीही असू द्या. माझा सख्खा भाऊ जरी असला, तरी मी कारवाई करेन”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.