शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन

मुंबई, २९ आॅगस्ट २०२५ : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीका केली आहे. यानंतर आता राज्य सरकारने वेगाने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. पुतळा कोसळण्यामागे काय कारणे आहेत आणि या घटनेसंदर्भात कारणमीमांसा करण्यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या समितीत स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री महत्वाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव आणि नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री नियुक्त केलेली समिती जबाबदारी निश्चित करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समिती तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, आयआयटी, स्थापत्य अभियंते, राज्यातील नामांकित शिल्पकार आणि नौदलाचे अधिकारी यांची एक तांत्रिक समितीही स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

नवा पुतळा उभारणार : एकनाथ शिंदे

या बैठकीत शिंदे म्हणाले जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने नौदल दिन साजरा करण्याच्या चांगल्या उद्देशाने पुतळा उभारला होता. आता भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. आता जो नवीन पुतळा उभारण्यात येईल तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.