supreme court

अजित पवार यांचं घड्याळ चिन्ह जाणार? सुप्रीम कोर्टाच्या प्रश्‍नामुळे गोंधळ

नवी दिल्ली, १४ मार्च २०२४ ः केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालायात धाव घेतली. या प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला तुम्ही दुसरे चिन्ह का निवडत नाही जेणेकरुन तुम्ही तुमच्या पक्षाचे कामकाज शांततेने आणि तणावाशिवाय करू शकता? निवडणुकीदरम्यान तुम्ही ते चिन्ह वापरणे सुरू ठेवू शकता अशी विचारणा केली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. अजित पवार आमच्या लोकप्रियतेचा वापर करत आहेत असा दावा शरद पवार गटाने केला. फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावरही आक्षेप घेण्यात आला. यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचं नाव वापरू नका असे निर्देश दिले. तसेच याच सुनावणीत अजित पवार गटाला तुम्ही दुसरे चिन्हा का घेऊ शकत नाहीत. त्या चिन्हाचा वापर तुम्ही आगामी निवडणुकीतही करू शकता, अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली.

सर्वोच्च न्यायालयाचा हा सवाल अजित पवार गटासाठी धक्काच मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ही विचारणा झाल्याचे स्पष्ट होत आहे. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. या सुनावणी त्यांनी अजित पवार शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसं वापरतात, ही फसवणूक आहे. शरद पवार गटाच्या लोकप्रियतेचा वापर का केला जात आहे असा सवाल करत सिंघवी यांनी अजित पवार गटाचे पोस्टर्स न्यायालयात दाखवले.