पुणे काँग्रेसमध्ये चाललय काय? पवारांच्या खेळीने काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर

पुणे, ८ मार्च २०२४: पुणे लोकसभा मतदारसंघ हा देशाच्या स्वातंत्र्य काळापासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. पण काँग्रेसची दयनीय अवस्था झाल्याने येथे चांगला उमेदवार मिळणे काँग्रेसला मुश्किल झालेले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार हे निश्चित असले तरी आता महाविकास आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार यांनी टाकलेल्या गुगली मुळे काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ झालेले आहेत. शरद पवार यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना लोकसभेचे उमेदवारी द्यावी त्यासाठी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी असा प्रस्ताव दिल्याने काँग्रेसमध्ये एकच खवळलेली आहे.

महाविकास आघाडीतील जागावाटप सुद्धा रखडलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जागांवरून अद्याप एकमत झालेले नाही. चार दिवसापूर्वी काँग्रेसची मुंबई येथे बैठक झाली, त्यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी असावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यास बहुतांश नेत्यांनी होकार दर्शविलेला आहे, त्याची अनौपचारिक घोषणा बाकी असल्याचे चर्चा सुरू होती. मात्र, अचानक गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार यांनी पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्या, प्रवीण गायकवाड यांना उमेदवार करून मराठा मतांचे गणित बांधून मताधिक्याने निवडून आणता येईल असा प्रस्ताव काँग्रेस पक्षापुढे ठेवलेला आहे. शरद पवारांनी अचानक पुण्याच्या जागेवर दावा केल्याने एकच खबर उडाली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुणे लोकसभा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे मात्र २०१४ पासून येथे भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेला आहे. यंदा देखील यापेक्षा वेगळी स्थिती नाही. अशी एकंदरीत परिस्थिती असताना सक्षम उमेदवार देऊन आता अतातटीची निवडणूक करावी असा प्रयत्न सुरू आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला धुळ चालणाऱ्या धंगेकर यांच्या नावाचा विचार केला जात आहे. धंगेकर यांनी वैयक्तिकरित्या लोकसभेची तयारी सुरू केली असली तरीही त्यांचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. काँग्रेसकडून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यास विलंब होत असताना वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झालेली आहे. शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरल्याने खळबळ उडाली आहे. प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असून मराठा, दलित आणि मुस्लिम या एकगठ्ठा मतदानवर ते निवडून येऊ शकतात असे गणित पवारांनी मांडले आहे. पण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या नावाला विरोध करत हा मतदारसंघ सोडणार नाही असे ठामपणे सांगितले आहे.