४०० पारची घोषणा केली तरीही मोदी शहा घाबरलेत – प्रकाश आंबेडकरांचा दावा
मुंबई, ८ मार्च २०२४: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० पारची घोषणा केली. दरम्यान, याच घोषणेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदी कितीही वल्गना करत असले तरी ते घाबरलेले आहे. त्यांच्यापेक्षा अमित शाह जास्त घाबरलेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांची मुंबईत सभा झाली. त्यावेळी ते म्हणाले की, मोदींनी ४०० पारची घोषणा केली. त्या चारशे पैकी ४८ जागा महाराष्ट्रात आहेत. ४०० जागांपैकी ४८ जागा वजा केल्या तर ३५२ जागा आहेत. भाजपच्या ४८ जागा कमी करणं ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आता एकत्रित पार पाडायची की वेगवेगळी, हे लवकरच ठरेल. पण, आपली महाविकास आघाडीसोबत युती झाली नाहीतरी आपल्याला लढायचं आहे. मोदींच्या विरोधात जे लढतात, ते आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. सध्या भाजपकडून 400 पारच्या गर्जना दिल्या जात आहेत. पण त्यांना 400 पार करायचं की नाही हे मतदारांनी ठरवावं. त्यांच्याकडून मोठमोठी आश्वासने दिली जातील, घोषणा केल्या जातील. पण तुम्ही मतदार आहात. मतदार जे ठरवतील तेच व्हायलं पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
यावेळी आंबेडकरांनी मोदींवरही टीका केली. ते म्हणाले, मोदी सांगतात की, देशातील जनता हाच माझा परिवार आहे. खरोखर मोदी जनतेला परिवार समजत असतील तर त्यांनी इलेक्शनच्या अॅफिडिव्हेट जे डिक्लेरेशन दिलंय की माझं लग्न झालं. तेव्हा त्या महिलेला एक दिवस तरी पंतप्रधानाच्या घरामध्ये ठेवावं. मग आम्ही म्हणून की, तुम्ही १४० कोटी लोकांचा बाप आहात. जो कुटुंबाचे नियम पाळत नाही, त्याला पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवून नका, असंही आंबेडकर म्हणाले.
आजवर राजकारणी आणि उद्योगपतींच्या घरावर धाडी पडल्या. त्यामुळं उद्योजक वर्ग धाडींना घाबरला. ज्यांची मालमत्ता ५० कोटींपेक्षा जास्त होती, अशा २४ लाख कुटुंबांनी २०१४ पासून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं. आता उद्योजक संपल्यावर पैसा कुणाकडे आहे, तर व्यापाऱ्याकडे आहे. निवडून आल्यावर मोदी व्यापाऱ्यांच्या शिकारी करतील. त्यामुळं आताच शहाणं व्हा, भाजपला पैसा द्या, पण मत देऊ नका, असं आंबेडकर म्हणाले.
ना खाऊंगा ना खाने दुंगा अशी घोषणा देत मोदी सत्तेत आले. आणि निवडून आल्यावर त्यांनी फक्त मार्केटिंग केलं. मार्केटिंग करण्यापलीकडे काही केलं नाही. मोदींच्या कार्यकाळात कारखाने बंद झालेच, त्यामुळं लोक बरोजगार झाले. मागच्या दहा वर्षात प्रचंड बेरोजगारी वाढली. नरेंद्र मोदींकडून गुजरातच्या माणसांना एक वागणूक आणि इतरांना वेगळी वागणूक दिली जाते. मोदींना पुन्हा सत्तेत आणले तर पुढच्या पाच वर्षांत सगळे कारखाने गुजरातला जातील. त्यामुळं भाजपला मतदान करू नका, असं आवाहनही आंबेडकरांनी केलं.