अजितदादा गेले नव्हते, त्यांना पाठवलेले – पहाटेच्या शपथविधीबाबत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा गौप्यस्फोट

मंचर, ५ मार्च २०२४: ‘‘उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सच्चा माणूस आहे. प्रचंड निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हितासाठी एखादा निर्णय घेतला, तर दोन दिवसानंतर तो निर्णय न बदलणारा. पहाटे दादांचा झालेला शपतविधी सर्वांना विश्वासात घेतल्यानंतरच झाला होता. दादा गेले नव्हते, दादांना शपथविधीसाठी पाठविले होते,’’ असा गौप्यस्पोट जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केला.

मंचर (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (ता. ४) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात आमदार बेनके बोलत होते. पहाटेच्या शपथविधीविषयी ते म्हणाले, ‘‘आम्हाला निरोप आल्यानंतर आम्ही सर्वजण यशवंतराव चव्हाण सेंटरला पोहचलो. त्यानंतर काय, काय झालं, आपल्याला माहित आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. दादांना पुन्हा उपमुख्यमंत्री केले. यापूर्वीही कॉंग्रेसबरोबर सरकार स्थापन करताना राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त होती. त्यावेळीही दादांना मुख्यमंत्री करता आले असते. पण, त्यांना उपमुख्यमंत्री केले.’’

रोहित पवार यांचा उल्लेख ‘युवराज’
आमदार रोहित पवार यांचा उल्लेख ‘युवराज’ असा करून आमदार बेनके म्हणाले, ‘‘काळू नदीतील पाणी पिंपळगाव जोगे धरणातून कर्जतला द्या, तसेच हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) नगर जिल्ह्याला पाणी देण्यासाठी १६ नोव्हेंबर २०१९ रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदामंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, रोहित पवार व जलसंपदा अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक झाली. त्यावेळी मी व वळसे पाटील यांनी धरणाच्या तळापासून होणाऱ्या बोगद्याला विरोध केला. युवराज सांगतात ते पूर्णपणे खोटे आहे.

आंबेगाव व जुन्नरचा पाण्यावर पहिला हक्क आहे. दिलीप वळसे पाटील व माझ्या छातीवर गोळ्या झाडा, पण थेंबभरही पाणी देणार नाही. जुलैअखेरपर्यंत या भागाला पाणी मिळेल, असे नियोजन केले आहे. अजित पवार यांच्यामुळे आपले पाणी वाचले आहे. – अतुल बेनके, आमदार, जुन्नर