मराठा आरक्षणाचा भाजपला धसका ? मित्रपक्षांच्या बैठकीत मराठा कुटूंबाचा कल जाणून घेण्याच्या सूचना

पुणे, ४ मार्च २०२४: राज्यशासनाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण दिले असले. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेत लोकसभेतला मराठा समाजाने प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. याचा फटका बसण्याचा धसका भारतीय जनता पक्षाने घेतला असून प्रत्यक लोकसभा मतदारसंघात किमान १० हजार मराठा घरांना भेटी देऊन त्यांचे दिलेल्या आरक्षणा बाबत मत तसेच त्यांचा कल जाणून घेण्याच्या सूचना भाजप पदाधिकाऱ्यांसह मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूकांच्या तयारीसाठी भाजपकडून प्रत्येकी ३ मतदारसंघाचे क्लस्टर तयार करण्यात आले असून पुणे, बारामती तसेच शिरूर मतदारसंघाची जबाबदारी उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. पाटील यांनी सोमवारी या तीनही मतदारसंघाच्या मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस राष्ट्रवादी काॅग्रेस, शिवसेना तसेच रिपाई ( आठवले गट) चे लोकसभा मतदारसंघाचे प्रत्येकी ५ पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा समाजाचा कल जाणून घ्या..
या बैठकीत मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या तिढयावर चर्चा करण्यात आली. शासनाने आरक्षण दिलेले असले तरी जरांगे यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे. त्याचा फटका लोकसभा निवडणूकीत बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे, या प्रकरणी मराठा समाजाचा कल जाणून सर्व पक्षीय पदाधिकारऱ्यांनी प्रत्येक मतदारसंघात किमान १०००० मराठा समाजाच्या कुटूंबाशी चर्चा करावी अशा सूचना करण्यात आल्या.जे शासनाच्या विरोधात असतील त्यांना शासनाची भूमिका समजावून त्यांचा कल बदलण्याच्या प्रयत्न करावा अशा सूचनाही देण्यात आल्या. तसेच पुण्यातील एका आमदाराकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

बारामतीत भिती
बारामती मध्ये या लोकसभेला विशेष कष्ट घ्यावे लागणार असून त्यासाठी मित्रपक्षांनी मदत करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. राष्ट्रवादीत पडलेल्या फूटीनंतर बारामती मध्ये सुप्रीया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांचा उमेदवार असणार आहे. मात्र ही लढत सोपी नसल्याची भितीही यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यासाठी मित्रपक्षांच्या मदतीची आवश्यकता असल्याने मित्रपक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.