कोल्हेंना खासदार करणे ही आमचीच चूक; सेलिब्रेटी कोल्हेंवर अजितदादा बरसले

शिरूर, ४ मार्च २०२४ ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाची पाहणी करायला सुरुवात केली. यामध्ये आज त्यांनी शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांचा मतदारसंघ असलेल्या शिरूर मतदार संघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी नट नट्यांचे राजकारणात काय काम? असं म्हणत अमोल कोल्हे यांच्यासह देशभरातील सेलिब्रिटी उमेदवारांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अशा सेलिब्रेटी आणि विशेषतः अमोल कोल्हे यांना पक्षात घेऊन, खासदार करून कशी चूक केली. याची कबूली दिली.
अजित पवार म्हणाले की, अगोदर मीच तुमच्याकडे डॉक्टर अमोल कोल्हे यांना मतदान करा म्हणून तुमच्याकडे विनंती करायला यायचो. त्यांना मी दुसऱ्या पक्षातून घरी नेऊन, पक्षात घेऊन, तिकीट देऊन, निवडून आणलं. मला वाटलं वत्कृत्व चांगलं आहे. दिसायला राजबिंडा आहे. चांगलं काम करतील. पण दोन वर्षानंतर ते म्हणायला लागले दादा मला राजीनामा द्यायचा.

मी म्हटले लोकांनी तुम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिले. असा मध्येच राजीनामा दिला. तर लोक जोड्याने मारतील आपल्याला. ते म्हणाले, मी कलावंत आहे. माझे नाटक, चित्रपट, मालिका असतात. त्यावर परिणाम होतो. तेव्हा मी त्यांना सांगितलं हे बरोबर नाही. असं करू नका. त्यावर ते म्हटले की, मी सेलिब्रेटी आहे. लोकांना मी मतदार संघात यावं वाटतं. पण यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम होतो. तसेच मला बाकी सर्वजण म्हणायचे की, तूच त्यांना पक्षात आणले. तर तूच त्यांना समजावून सांग. हे सर्व मी अमोल कोल्हे यांच्या तोंडावर खरं खोटं करू शकतो. त्यामुळे अमोल कोल्हे यांचा राजकारण हा पिंडच नाही. आम्ही राजकारणी लोक एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर सेलिब्रेटी काढतो. अशी कबुली देखील यावेळी अजित पवारांनी दिली.

देशात देखील बघा, काही ठिकाणी हेमामालिनी उभ्या राहतात निवडूनही येतात. कुठे सनी देओल, तर कुठे धर्मेंद्र, गोविंदा उभे राहतात. मात्र लोकांचा राजकारणाशी काय संबंध? एकदा अमिताभ बच्चन यांना देखील उभा केलं होतं. ते निवडून देखील आले होते. पण ते नंतर म्हटले की, हे आपलं काम नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. राजकारण सोडून दिले. त्यामुळे या लोकांना त्या भागातील विकासाची काम करायला आवड आहे का? हे महत्त्वाचं असतं. नवीन माणूस आला की, थोडे दिवस आपल्याला हे चांगलं वाटतं दिसायला राजबिंडा मिश्यावर पिळ मारणारा असला की आपण मतदानासाठी बटन दाबतो. त्यात आमची ही चूक आहे. पण आम्ही काही अंतर्ज्ञानी नाही. असं वाटतं निघेल चांगला. पण त्याच्या डोक्यात काय चाललं आहे? हे आम्हाला कळायला मार्ग नाही. तसं आपलं झाले. तसेच कोल्हे मध्ये शिवजयंतीला भेटले. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, का ओ डॉक्टर तुम्ही राजीनामा देणार होतात. पण आता परत दंड थोपटले. त्यावर कोल्हे म्हटले की, दादा आता वाटते परत उभे रहाव. पण असं कसं चालेल. असं म्हणत अजित पवारांनी कोल्हेंच्या मतदारसंघात त्यांची चांगलीच शाळा घेतली.