शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांचे एक पाऊल मागे
पुणे, २२ फेब्रुवारी २०२४ :पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला मिळणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या जागेवरून दिलेल्या एका प्रतिक्रियावरून ते लोकसभा निवडणुकीत एका अर्थाने बॅकफूटवर गेले आहेत. ही जागा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपला सोडली जाऊ शकते, आमची त्याला हरकत नाही, असे आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.
आढळराव पाटील यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती नुकतीच झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव यांना मोठे पद दिले आहे. म्हाडाच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत आढळराव पाटील म्हणाले, युतीमध्ये जागा वाटप हे गेल्या निवडणुकीत एक नंबर मते व दोन नंबर मते मिळाल्यानुसार होणार आहे. एक नंबरचा उमेदवार हा आपल्याकडे नाही तो तिकडे आहे. तर दोन नंबरचे मते शिवसेनेला मिळालेली आहेत. मुख्यमंत्र्यांची पहिल्यापासून भूमिका आहे की दुसरा उमेदवार या जागेवर दावा सांगू शकत नाहीत, अशी भूमिका मांडताना जागा सोडण्याबाबत सकारात्मक भूमिका आढळराव पाटील यांनी मांडली.
दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी ठरवले तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा भाजपला जाईल. या प्रमाणाने त्यांचे नियोजन असेल तर आमची त्याला हरकत नाही, असे आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. एका अर्थाने आढळराव पाटील हे बॅकफूटवरच आले आहे.
अजितदादांना हवा मतदारसंघ
पुण्यातील बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दावा सांगितला आहे. बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर शिरुर मतदारसंघातून मुलगा पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाची ताकद जास्त आहेत. तसेच अमोल कोल्हे यांना लोकसभेला पराभूत करण्याचा चंगही अजित पवार यांनी बांधलेला आहे. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. त्यामुळे अजित पवार यांना शिरुर मतदारसंघ हवा आहे. भाजपही दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास तयार आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांनीही एकप्रकारे या मतदारसंघातून माघार घेण्याची भाषा केल्याचे बोलले जात आहे.