सख्ख्या पुतण्याने देखील अजित पवार यांची साथ सोडली
बारामती, २१ फेब्रुवारी २०२४ : अजित पवारांनी वेगळी वाट धरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर फूट पडलीच, पण पवार कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. बारमतीमध्ये अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानं तर त्याला अधिक खतपाणी घातलं गेलं. अजित पवार यांनी बारमतीमध्ये मतदारांना भावनिक साद दिली. त्यासोबत माझं कुटुंब सोडून पवार कुटुंब माझ्याविरोधात असल्याचा भावनिक डाव अजित पवारांनी खेळला. पण आता शरद पवारांनी अजित पवारांना मोठा दक्का दिलाय. होय.. अजित पवारांचा सख्खा पुतण्या शरद पवारांसोबत निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराला उभा राहणार आहे.
युगेंद्र पवार शरद पवारांसोबत –
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार भाजपसोबत घरोबा करत सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. मात्र अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पवार कुटुंबाला पटलेला नसल्याचं सांगण्यात येत आहे. दोनच दिवसापूर्वी अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितले होते की माझं कुटुंब सोडून इतर कुणीही माझ्या कुटूंबातील माझा प्रचार करणार नाही. त्यानंतर काही दिवसांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या शहर कार्यालयाला आज सकाळी साडे दहा वाजता भेट देणार आहेत. शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शहर कार्यालयाला उपस्थित राहण्याचे आवाहन युगेंद्र पवार यांनी केली आहे.. एकंदरीत आता युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होत असल्याने अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय.
रायगड जिल्ह्यात सुनिल तटकरे यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी मोठा डाव खेळला आहे. सुनिल तटकरे यांचे मोठे भाऊ अनिल तटकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश झाला. पक्षाकडून प्रवेश करताच अनिल तटकरे यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. अनिल तटकरेंच्या पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शेकापचे आमदार जयंत पाटील देखील उपस्थित होते.
बारामती शरयू फाउंडेशनच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे तसेच बॉक्सिंगपटू मेरी कोम यांनी हजेरी लावली. अजित पवार यांची भावजय शर्मिला पवार यांनी बारामती हाफ मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. यंदाचं हे दुसरे वर्ष आहे. या हाफ मॅरेथॉनमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मागच्या वर्षी या मॅरेथॉनच्या सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. तर बक्षीस वितरणाला अजित पवार यांनी हजेरी लावली होती. परंतु यंदाच्या वर्षी या मॅरेथॉनचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाला.