शरद पवारांना काहीच नको म्हणणे ही वकिलांची दडपशाही – सुप्रिया सुळे
पुणे, २० फेब्रुवारी २०२४: अजित पवार यांच्या वकिलांनी आज न्यायालयात शरद पवार यांना पक्ष चिन्ह द्यायचे नाही, असा युक्तिवाद केला. ही त्यांची मला दडपशाही वाटते. न्यायालयाने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिले असले तरी हा अंतिम निर्णय नाही. शरद पवार यांना पक्ष व चिन्ह दिले गेले पाहिजे असे सांगितले, हा आमच्यासाठी दिलासा आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे, त्यावर आज दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘अजित पवार जेव्हा म्हणतात शरद पवार यांची निवड चुकीची आहे. पण न्यायालयात दोघांच्याही निवड चुकीची आहे, असं असं म्हणत आहे. शरद पवार यांना काहीच द्यायचे नाही, असं कसं म्हणू शकता?, अजित पवार यांना पक्ष चिन्ह दिलंय, ते फायनल ऑर्डर नाही. असंही न्यायालयाने म्हटलं आहे. आमच्या पक्षाला नवीन चिन्ह दिलं पाहिजे. अजित पवार यांचे वकील दडपशाही करत आहेत, असं वाटतं.
ज्या माणसाचा पक्ष आहे, त्या माणसाला काहीच द्यायच नाही. आयुष्यात आम्ही काय करायचं? भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे. हा रडीचा डाव आहे. महाराष्ट्राची तुलना शेजारच्या देशाशी होते, हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. वैचारिक लढाई लढायची आहे, अशी टीका सुळे यांनी केली.