बारामतीला धडका मारू नका डिपॉझिट जप्त होईल – अजित पवार
पुणे, ८ सप्टेंबर २०२२: भाजपाचे सध्या मिशन महाराष्ट्र सुरू आहे. बारामतीही त्यातच येते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या वक्तव्याचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही. त्यापेक्षा भाजपाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असा सल्ला अजित पवार यांनी फडणवीस यांना दिला आहे. तसेच गेल्यावेळी माझ्याविरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्यासहित सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं, असा टोला ही दिला.
अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांची विविध मुद्द्यांवर संवाद साधला. अजित पवार म्हणाले,मी माझ्या कामाची सुरुवात पहाटे लवकर उठून करतो. त्यामुळे सलग सातव्यांदा मला बारामतीची लोकं निवडून देत आहेत. लोकांनी मला निवडून दिलं आहे म्हणून मी काम करत असतो. त्यामुळे बारामतीकर मला मताधिक्याने मला निवडून देतात. काही दिवस झाले अनेक नेते बारामतीला भेट देत आहे. महाराष्ट्रात कूठेही फिरण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, असंदेखील ते म्हणाले.
देशद्रोहाच्या कबरीचे सुशोभीकरण होणं चुकीचं
आज सकाळपासून याकूब मेमन दफनभूमी सुशोभीकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही माध्यमांशी संवाद साधत भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार म्हणाले, याकूब मेमन दफनभूमी सुशोभीकरणाबाबत मला कोणीतीही माहिती नाही. मी विरोधी पक्ष नेता आहे, त्या नात्याने मी या घटनेची संपूर्ण माहिती घेईन. मात्र, अशाप्रकारे देशद्रोहाच्या कबरीचे सुशोभीकरण होणं चुकीचं आहे.
सर्व जिल्ह्यांना लवकरात लवकर पालमंत्र्यांची नेमणूक करावी
सरकार स्थापन होऊन देखील आतापर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री नाही त्यामुळे सगळेच निर्णय अधिकारी घेऊ शकत नाही. त्यामुळे जनतेची कामं खोळंबली आहेत. अधिकाऱ्यांनादेखील कळत नाही सरकार किती दिवस चालेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच राज्यासाठीचे सगळे निर्णय घेत आहेत. सध्या मंत्रिमंडळात 20 मंत्री आहेत परंतु पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांना लवकरात लवकर पालमंत्र्यांची नेमणूक करावी.अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.