तुमच्यात हिंमत असेल तर माझ्या सारखा तगडा उमेदवार द्या – सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना खुले आव्हान

नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२४: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यंदाचा संसद महारात्न पुरस्कार जाहीर झाला आहे. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संसदेत भाषणं करून कामं होत नसतात, अशी टीका केली होती. त्यानंतर आज पुरस्कार जाहीर होताच सुप्रिया सुळे यांनी तो बारामती लोकसभेतील मतदारांना अर्पण केला. “संसद आमच्यासाठी लोकशाहीचे मंदिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा जेव्हा खासदार म्हणून लोकसभेत आले तेव्हा त्यांनी लोकसभेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवलं. या संसद भवनात जेव्हा आम्ही येतो, तेव्हा देशाच्या कल्याणासाठी विविध विषयावर चर्चा करतो. देशासाठी जी नवीन धोरणे आखली जातात, ती याच लोकशाहीच्या मंदिरात. काही लोकांनी संसदेवर आणि तेथील चर्चेवर जी टीका केली, ती अयोग्य असून हा एकप्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीसाठी कुणीतरी विरोधात उभे राहणारच. त्यांच्याकडे माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर जरूर त्यांनी उभा करावा. त्या उमेदवाराशी मी जाहीर चर्चा करायला तयार आहे. ते म्हणतील त्या ठिकाणी, कधीही आणि कोणत्याही विषयावर मी चर्चा करण्यासाठी तयार आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

आज दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या आरोपांना उत्तर दिले. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात मी देईल, त्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन बारामतीमधील लोकांना दिले आहे. मी निवडणुकीला उभा आहे, असे समजून मतदान करा. जर लोकसभेला माझ्या उमेदवाराला मतदान नाही दिले, तर विधानसभेला मी उभा राहणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना निवडणुकीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा असताना आता यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.

राजकारणाला कौटुंबिक पातळीवर आणून ठेवले
“अजित पवार यांच्या भाषणानंतर मला वेदना झाल्या. राजकारण कौटुंबिक पातळीवर आणून ठेवलं आहे. माझं राजकारण कौटुंबिक नसून जनसेवेचं आहे. मी राजकारणात, समाजकारण चांगला बदल घडविण्यासाठी एक धोरणकर्ती म्हणून पुढे आले. बारामतीमधील लोकांनी मला तीन वेळा निवडून दिले. संसद हे लोकशाहीचे सर्वात मोठे मंदिर आहे. लोकशाहीसाठी अनेक महापुरुष लढले, त्याच लोकशाहीवर अविश्वास दाखवला गेला. हे अतिशय चिंताजनक आहे. हा देश लोकशाहीकडून दडपशाहीकडे जावा, अशी काहींची इच्छा आहे का? अशी शंका मनात येते”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.