मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका औषधे जपून घ्या – प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
अकोला, १७ फेब्रुवारी २०२४ : मनोज तरंगे पाटील यांना दिल्या जाणाऱ्या औषधासह सलाईन मधून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ही औषधे तपासून घ्या, असा धोका वजा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना वेगळं मराठा आरक्षण देऊ, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु, मनोज जरांगे नोंदी असलेल्यांना आणि शपथपत्रासह सगेसोयऱ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्याच्या मगणीवर ठाम आहेत. त्यामुळेच ते पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. परंतु, जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नाकातून रक्त येत होतं. तसेच त्यांना पोटदुखीचा त्रास होतोय. त्यांना बसून नीट बोलता येत नाहीये. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक उपोषणस्थळी उपस्थित आहे. परंतु, जरांगे पाटील उपचार घेण्यासही तयार नाहीत. आंदोलकांच्या आग्रहानंतर त्यांनी सलाईन लावून घेतली आहे. अशातच मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याचा अप्रत्यक्ष इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मनोज जरांगे यांचं आंदोलन ज्या पद्धतीने चालू आहे. त्या आंदोलनामुळे अनेकजणांना धक्का लागण्याची शक्यता आहे. त्या धक्यामुळे बरेचजण धास्तावले आहेत. निजामी मराठ्यांच्या राजकारण विरोधात जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक पाऊल उचललं आहे हे स्पष्ट झालं आहे. त्यांमुळे त्यांना जी औषधं दिली जात आहेत, जी सलाईन, जेवण आणि ज्युस (फळांचा रस) दिला जातोय, या सगळ्या गोष्टी तपासायला हव्यात. त्यानंतरच त्यांनी त्याचं सेवन करावं. शासन ही व्यवस्था करेल अशी अपेक्षा मी बाळगतोय.
मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका आहे का? या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे ज्या पद्धतीने राजकारण बदलू पाहत आहेत. त्यांचं आंदोलन असंच चालू राहिलं तर अनेक जणांचे खेळ संपणार आहेत, सत्ता जाणार आहे. लोकांच्या संपत्तीवर टाच येऊ शकते. राजकारणात काहीही होऊ शकतं. मनोज जरांगे यांना असलेला धोका लक्षात घेता मी शासनाला विनंती करतो की तुम्ही मनोज जरांगे यांच्यासाठी जे डॉक्टर्स नेमले आहेत, त्या डॉक्टरांना सक्त ताकीद दिली पाहिजे की तपासल्याशिवाय, बघितल्याशिवाय जरांगेंच्या गोष्टींमध्ये कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नका.
आंबेडकर म्हणाले, आगामी काळात राजकारणाात भयंकर मोठी उलथापालथ होणार आहे. तरीही आपल्याला सरकारी डॉक्टरांवर विश्वास ठेवावा लागेल. मी जरांगेंना सल्ला देईन की ते जी औषधं, साईन, ज्युस किंवा जेवण घेत आहेत त्या गोष्टी जवळच्या व्यक्तीला तपासायला लावा. जेवण हे ओळखीच्या माणसाने दिलेलं असलं पाहिजे. तसेच ज्या दुकानातून साहित्य आणलं जातंय तो दुकानदार ओळखीचा असायला हवा. जेवण तुमच्या घरातून आलं असेल तर उत्तम. मनोज जरांगे यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला आव्हान दिलं आहे. त्यामुळे त्यांनी आता सावध असलं पाहिजे.
आमदाराच्या गाडीवर हल्ला
नांदेड : नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे हे पिंपळगाव निमजी (ता. जि. नांदेड) कीर्तन कार्यक्रमासाठी आले असता, शुक्रवारी रोजी रात्री उशिरा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आमदार मोहनराव हंबर्डे बचावले, मात्र त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.