राऊतांना भेटणेही झाले अवघड
मुंबई, ७ सप्टेंबर २०२२: पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक होते.
मात्र, आर्थर रोड कारागृह प्रशासनाने ठाकरेंना परवानगी नाकारली. मात्र, त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी हे वृत्ता फेटाळले आहे.
ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक होते. पण तुरुंग प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. उद्धव ठाकरे यांना भेटीसाठी कोर्टाची परवानगी घेण्याचे निर्देश आर्थर रोड कारागृह प्रशासनाने दिले आहेत.
जेल अधिक्षकांच्या कार्यालयात संजय राऊत यांना भेटायला द्यावं असा निरोप उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ऑर्थर रोड कार्यालयाला पाठवण्यात आला होता. मात्र यावर ऑर्थर रोड कारागृह प्रशासनाने नकार देत अशी भेट घेता येणार नाही त्यासाठी कोर्टाची परवानगी घेऊन या असा निरोप दिला.
काय आहे प्रकरण?
गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय यांना ईडीकडून 1 ऑगस्टला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ आणि त्यानंतर ईडी कार्यालयात आठ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक झाली होती. सुरूवातीला संजय राऊतांना 4-4 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. तर 8 ऑगस्टला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
राऊतांना 08 ऑगस्ट रोजी त्यांची ईडी कोठडी संपली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने राऊत यांची आणखी काही दिवस कोठडी मागितली होती. मात्र राऊतांच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आता त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले.