हजारो कार्यकर्ते, शेकडो वाहनांसह जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने प्रस्थान

अंतरवाली सराटी, २० जानेवारी २०२४ : गेल्या सात महिन्यापासून मनोज जरंगे पाटील यांचे मराठा आंदोलन सुरू असताना अद्यापही सरकारने ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण दिलेले नाही. मराठ्यांची वारंवार फसवणूक सुरू असल्याने अखेर आता शेवटचा मार्ग म्हणून जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढला आहे. या मोर्चाची आजपासून सुरुवात झाली. आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे फिरणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून त्यांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलेले होते. मात्र राज्य सरकारकडून या मोर्चावर लाठी चार्ज झाल्याने या आंदोलनाला महाराष्ट्रभर व्यापक स्वरूप निर्माण झाले. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. पहिल्या टप्प्यात दोन महिन्यात आरक्षण देऊ असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते मात्र त्यानंतरही आरक्षण मिळाले नाही. त्यानंतर पुन्हा जरांगे पाटील यांनी १३ दिवसाचे उपोषण केले त्यानंतर आरक्षण मिळाले नाही. गेल्या दोन महिन्यापासून जरांगे पाटील यांनी सरकारकडून वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप करत आता मुंबईवर मोर्चा काढला जाणार असा इशारा अडीच महिन्यापूर्वी दिला होता. यादरम्यानच्या काळात सरकारकडून चर्चा करण्यात आली पण ठोस आश्वासन मिळाले नाही व निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आता मुंबईच्या दिशेने मोर्चा केला आहे.

या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. आंतरवाली सराटी गावात सध्या प्रचंड गर्दी झाली आहे. शेकडो ट्रक, ट्रॅक्टर्स तयार ठेवण्यात आले आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केला. मराठा समाजाने सरकारला सात महिन्यांचा वेळ दिला. मात्र अजूनही आरक्षण मिळालं नाही. आता शेवटची आरपारची लढाई आहे. त्यामुळे कुणी घरात राहू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप