दादा गटाच्या महिला मेळाव्यात अजित पवारांना मुख्यमंत्री करा; महिला कार्यकर्त्यांच्या घोषणा

मुंबई, १८ जानेवारी २०२४: एकीकडे शिवसेनेकडून आगामी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले जात आहे, भाजपचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी फिल्डींग लावली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या महिला संघटनेचा राज्यस्तरीय भव्य ‘नारी निर्धार मेळावा’ संपन्न झाला. यामध्ये महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच सभागृहात उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्या ‘अजितदादा भावी मुख्यमंत्री’ असा मजकूर असलेल्या टोप्या घालून आलेल्या दिसल्याने अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे.

यामेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रमुख मार्गदर्शन करत आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या तयारीला लागा महिलाना संधी आहे असे आवाहन केले.

आज मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महिला मेळावा अजित पवार गटाकडून आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना तटकरे म्हणाले की, आज अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महिलांची प्रचंड शक्ती उभी राहिली आहे. २ जून रोजी अजितदादांनी जो निर्धार करून निर्णय घेतला, त्या निर्णयामागे तुम्ही महिला खंबीरपणे उभ्या राहिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगडावर उभी केली. तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार इथे रुजवण्याची गरज आहे, असं तटकरे म्हणाले.

तटकरे म्हणाले, अल्पसंख्याक समाजही अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी ठाम उभा राहिलेल्या पहायला मिळत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह देशात काम करत आहेत तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार काम करत आहेत. अनेक जनहिताचे निर्णय आपण सत्तेत आल्यानंतर घेतले. अदिती तटकरेंनी महिलांचे चौथे धोरण आणले आहे. हेच महिला धोरण २४ – २५ वर्षात महिलांसाठी आवश्यक ठरणार आहे, असं तटकरे म्हणाले.

दरम्यान, आता लोकसभा, विधानसभा निवडणुका येणार आहेत. या निवडणुकांत आपल्याला सत्ता कायम राखायची आहे. कारण, सत्तेत राहूनच आपण विकास करू शकतो. आता अजित पर्व सुरू झालं. मात्र, आगामी निवडणुकांचा काळ आपली राजकीय परीक्षा घेणारा आहे. त्यामुळं आपल्या घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तुम्ही आतापासूनच तयारीला लागा, असं आवाहन तटकरेंनी केलं.
आगामी निवडणुकीत महिला निवडून येतील.

या मेळाव्यात बोलतांना अजित पवार म्हणाले, आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आज एसटीमध्ये वाहकाबरोबर आता चालकही महिला बनल्या आहेत. वैमानिक बनल्या आहेत. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. आता ५० टक्क्यापेक्षा जास्त महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत आहेत. आगामी निवडणुकीतही महिला निवडून येतील, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप