कोल्हापूर-हातकणंगले शिवसेनेलाच! हसन मुश्रीफांची घोषणा
कोल्हापूर, १६ जानेवारी २०२४ : कोल्हापूर आणि हातकणंगले या जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेला अर्थात शिंदे गटाला देण्यात येणार आहेत, अशी घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कोल्हापूरमध्ये नुकताच महायुतीचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या मेळाव्यादरम्यान पत्रकारांनी “भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनी केली आहे का?” असा सवाल मुश्रीफ यांना केला. यावर बोलताना ते म्हणाले, याबाबत आपल्याला कल्पना नाही. मात्र कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा शिवसेनेला देण्याचे ठरले आहे. त्यामुळे इतरांना ही जागा दिली जाण्याबाबत माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर किंवा हातकणंगले या दोन्हीपैकी एका जागेसाठी भाजप आग्रही आहे. कोल्हापूरमधील हातकणंगले अथवा कोल्हापूर या दोन्हीपैकी एक मतदारसंघ मिळावा अशी मागणी भाजपने केली आहे. दोन्हीकडे भाजपची चांगली ताकद आहे, असा पक्षाचा दावा आहे. त्यामुळे आता मुश्रीफ यांनी या दोन्ही जागा शिवसेनेला देणार असल्याची घोषणा केली असली तरीही याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हातकणंगलेमधून सध्या तरी शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांचे नाव अंतिम मानले जात आहे. मात्र हातकणंगले वाटणीला आल्यास भाजपने प्लॅन ए म्हणून माने यांनाच भाजपच्या तिकीटावर उतरविण्याची तयारी केली आहे. तर प्लॅन बी म्हणून काँग्रेसचे माजी खासदार कलाप्पा आवाडे यांचे नातू आणि भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांचे नाव डोळ्यासमोर ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. स्वतः राहुल आवाडे यांनी निवडणुकीसाठी इच्छा दर्शविली आहे.