“तुमच्या जागा वाटपाची चर्चा जाहीर करा, अन्यथा मी ४८ जागा लढवायला तयार” – प्रकाश आंबेडकरांनी घेतला संजय राऊतांचा समाचार

मुंबई, ८ जानेवारी २०२३: लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना महाविकास आघाडीतील जागा वाटप रखडले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशावर अजून निर्णय झालेला नाहा, त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी वंचितचा प्रवेश लवकरच होईल यावर आमची चर्चा झाली आहे असे सांगितले. त्यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राऊतांचा खरपूस समाचार घेत काँग्रेस आणि तुमच्यात काय चर्चा झाली ते जाहीर करा, लोकांना सगळे कळू द्या. अन्यथा मी लोकसभेच्या ४८ जागा लढविण्यास तयार आहे असे प्रत्युत्तर दिले.

ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी वंचितच्या मविआतील सहभागाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सूचक विधान केलं होतं. “शिवसेना हा मविआमधला प्रमुख घटक पक्ष आहे. आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे. त्यामुळे आम्ही असं मानतो की वंचितही मविआची घटक आहे. लोकसभेच्या दृष्टीने सध्या चर्चा चालू आहे. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानाने मविआमध्ये सहभागी करण्यासंदर्भात आत्तापर्यंत किमान ६ ते ७ वेळा सकारात्मक चर्चा झाली आहे. अकोल्याची जागा परंपरेनं प्रकाश आंबेडकरच लढतात. त्यांनीच ती लढावी. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. याशिवाय वंचितचे उमेदवार कुठे उभे करता येतील, यावर चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे”, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

प्रकाश आंबेडकरांनी यासंदर्भात उत्तर देताना ठाकरे गटाला व पर्यायाने उद्धव ठाकरेंना खोचक सवाल केला आहे. “माझी या सगळ्या पक्षांना थेट ऑफर आहे. अकोला हा मतदारसंघ काही फार महत्त्वाचा नाही. मी लढलो किंवा नाही लढलो तरी त्यानं फार फरक पडत नाही. ज्या कुठल्या पक्षाला अकोला लढायचंय, त्यांनी लढावं. त्यांच्यासाठी आम्ही काम करू. पण तुमचा जागावाटपाचा फॉर्म्युला तरी बाहेर येऊ द्या. वंचित हे काही त्यातलं लक्ष्य नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“तुमचं आणि काँग्रेसचं जागावाटप काय झालं ते सांगावं. तेही नसेल, तर किमान राष्ट्रवादीबरोबर तुमचं जागावाटपाचं काय ठरलंय, ते तरी शिवसेनेनं लोकांना सांगावं. आमच्याबरोबर चर्चा झालेला फॉर्म्युला म्हणजे इतर दोन पक्षांबरोबर त्यांचं काही ठरलं नाही, तर आम्ही व शिवसेना २४-२४ जागा लढवू. अकोल्याची जागा कुठल्याही पक्षानं लढावी, जो लढेल त्याला मी जिंकून आणेन. त्यांनी अकोल्याचा बाऊ करून स्वत:वरच्या जबाबदाऱ्या बाजूला करू नयेत”, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाला दिला.

“जागावाटपावर आजपर्यंत का निर्णय झाला नाही याचं प्रामाणिकपणे उत्तर त्यांनी जनतेला द्यावं. नसेल तर त्यांनी सरळ जनतेला सांगावं की २४ जागा ते लढतील, २४ जागा आम्ही लढवू. विषय सुटेल. आघाडी झाली नाही तर आम्हाला पूर्ण ४८ जागा लढाव्या लागतील. त्यामुळे आमची तयारी त्या दृष्टीने चालू आहे. त्यांनी मोदीचं ऐकलं, तर जेलच्या बाहेर. माझं ऐकलं तर जेलच्या आत. मग कुणाचं ऐकतील ते तुम्हीच ठरवा”, असं सूचक विधान प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केलं.