आमदार सुनील कांबळे यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँगेसचे आंदोलन
पुणे, ६ जानेवारी २०२३: कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (शरद पवार गट) शनिवारी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. ससून रुग्णालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
ससून रुग्णालयातील विविध विकास कामांचे शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास आमदार सुनिल कांबळे यांनी मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली ससून रुग्णालय येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी रवींद्र माळवदकर, कणव चव्हाण, शेखर धावडे, नितीन पाटोळे, मीना पवार, अजिंक्य पालकर, सुवर्णा माने, मृणाल वाणी, रूपाली शिंदे, गणेश नलावडे, नीता गलांडे, दीपक कामठे आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले,”आमदार सुनिल कांबळे यांनी केलेल्या या प्रकारामुळे पोलिस दलाचा अपमान झाला आहे. कायदा करणारेच कायदा मोडत असतील तर जगापुढे आपण आपली काय प्रतिमा तयार करत आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने आमदार सुनिल कांबळे यांना तातडीने पदमुक्त करावे. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वपक्षाच्या आमदाराचा राजीनामा घेता येत नसेल तर त्यांनी स्वतः गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.”