नैसर्गीक युती सोडू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले – एकनाथ शिंदे यांची खेडमधून टीका

खेड (पुणे), ६ जानेवारी २०२४ ः ठरवल असत तर बाळासाहेब ठाकरे हे १९९५ ला मुख्यमंत्री झाले असते, पण त्यांनी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. पण २०१९ ला भाजपसोबतची नैसर्गीक युती तोडत, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन उद्धव ठाकरे लगेच मुख्यमंत्री झाले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांच्यावर टीका केली.
शिवसेनेत जून २०२२ मध्ये अभूतपूर्व बंड झाल्याचं महाराष्ट्राने पाहिलं आहे. शिवसेनेचे नेते आणि तत्कालीन नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळी चूल मांडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत भाजपाशी युती करून राज्यात सत्तास्थापन केली. तसेच ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री झाले. यानंतर एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटातील नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गद्दार म्हणू लागले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाशी बंडखोरी केली असा आरोप त्यांच्यावर केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत त्यांची बाजू मांडली.

शिवसेनेच्या शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा (शिवसंकल्प अभियान) शनिवारी (६ डिसेंबर) खेड येथे पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्या पक्षात सातत्याने इनकमिंग चालू आहे. शुक्रवारी (५ डिसेंबर) परभणीत ५० नगरसेवकांनी आपल्या पक्षात प्रवेश केला. मुंबईत रोज प्रवेश चालू आहेत. हजारो लोकप्रतिनिधी, शिवसैनिक मोठ्या विश्वासाने शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत आहेत. लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. लोकांचा हा विश्वास सार्थ करण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सत्तेचा लोभ मनात ठेवून काहीजण पक्ष सोडतात. मी सत्तेचा लोभ मनात ठेवून हा निर्णय घेतला नव्हता. मी अतिशय प्रामाणिकपणे ही भूमिका घेतली. केवळ पक्ष वाचवण्यासाठी आणि शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी मी ही भूमिका घेतली. मला एवढंच सांगायचं आहे की, मला कधीही पदाचा, सत्तेचा मोह नव्हता, आजही नाही. त्यावेळी मी नगरविकास खात्याचा मंत्री होतो. माझ्याबरोबर सात-आठ मंत्री होते. आम्ही सगळ्यांनी सत्तेवर लाथ मारली. केवळ बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना टिकण्यासाठी आम्ही हे सगळं केलं. बंड करायचंच असतं तर आम्ही ते २०१९ लाच केलं असतं. मी बाळासाहेबांचा शिवेसैनिक आहे, आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “२०१९ ला खोटं बोलून भाजपाबरोबरची नैसर्गिक युती तोडली होती. त्यामुळे बंडाचा निर्णय तेव्हाच घेतला असता. कारण, आम्ही तसं काही केलं असतं तर शिवसेना रसातळाला गेली असती. म्हणून आम्ही तेव्हा तसा निर्णय घेतला नाही. १९९५ ला शिवसेनेची पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना वाटलं असतं तर ते तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते. परंतु, यावेळी सत्ता येताच लगेच मुख्यमंत्री झाले, असं वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.