आरोग्य विभागाकडील विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करा: आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे निर्देश
मुंबई, दि. ४/०१/२०२४: आरोग्य विभाग अंतर्गत राज्यात नवीन शासकीय रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, प्रथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच शासकीय रूग्णालयांच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. ही सर्व विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहे.
आरोग्य विभागाकडील विविध विषय, योजनांची आढावा बैठक मंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यावेळी अप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, महात्मा फुले जनआरोग्य अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, सहसचिव अशोक आत्राम, सहसंचालक विजय बावीस्कर, विजय कंदेवाड आदी उपस्थित होते.
‘राईट टु हेल्थ’ कायदा याविषयी सूचना देताना मंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्यात ऐतिहासिक असा राईट टु हेल्थ कायदा निर्माण करावयाचा आहे. या कायद्याचा मसुदा विधी व न्याय विभागाकडून अंतिम करून घ्यावा. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभूत सोयी सुविधा कक्षामार्फत राज्यात आरोग्य क्षेत्रातील विकास कामे सुरू आहेत. तसेच काही कामे मंजूर आहेत. ही कामे विहीत कालमर्यादेत पुर्ण करावी. प्रलंबित कामे न ठेवता रखडवू नये. आरोग्य विषयक महत्वाचे दिवसांचे वार्षिक कॅलेंडर तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाबाबत निर्देश देताना मंत्री डॉ. सावंत म्हणले, औषधी खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी. प्रलंबित खरेदी ठेवता कामा नये, कुठेही औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. वस्तू खरेदी प्राधिकरणाची विशिष्ट कार्यपद्धती (एसओपी), ई- गोदाम, ई- पासबूक आणि ई- लॉजीस्टीक याबाबत कार्यवाही करावी. प्रक्रिया गतीने पूर्ण करून प्राधिकरण सक्षम करावे.
यासोबतच अर्थसंकल्पीय तरतूद, खर्च व नियेाजन, खरेदी कक्षाकडील प्रलंबित विषय, विकास कामे, कॅथलॅब, रूग्णवाहिका 108 आदींचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.सदर बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.