“श्रीरामाबद्दल बोलण्याच्या ओघात बोलून गेलो” – संतापाची लाट उसळल्यानंतर आव्हाड बॅकफुटवर
शिर्डी, ४ जानेवारी २०२४: नगर जिल्ह्यातील शिर्डीतील अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठला. त्यांच्या या वक्तव्याचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. तसेच आव्हाड यांना अटक करण्याची मागणी होत असताना आता आव्हाड यांनी स्वतःच माध्यमांसमोर येत या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. काल माझं सगळं भाषण चांगलं झालं. तरीही फक्त एका वाक्यामुळे जे वाक्य मी बोललो. त्याप्रती लोकांच्या ज्या भावना आहेत त्यावर मी खेद व्यक्त करतो. काल बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. लोकभावनांचा आदर करणं महत्वाचं आहे. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काल शिबिरात भाषणादरम्यान प्रभू श्रीरामांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. आव्हाड म्हणाले, मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. जे बोलतो ते संदर्भासह बोलतो. अभ्यास करूनच बोलतो. इतिहासाचं विकृतीकरण करण्याचं काम माझं नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो. आता हा वाद मला वाढवायचा नाही. वाल्मिकी रामायणात ते लिहिलं असेल त्यावर कुणाचा आक्षेप असेल तर सांगावं. परंतु, आजकाल अभ्यासाला महत्व नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.
अयोध्येत राम मंदिर होत आहे. या ठिकाणी जाणार का, असा प्रश्न विचारला असता आव्हाड म्हणाले, कुणाच्या बोलावण्यावरून मी मंदिरात जाणारा माणूस नाही. मला ज्यावेळी वाटेल त्यावेळी मी जाईन. वनवासकाळी जिथून श्रीराम गेले त्या गावाचा मी आहे. त्यामुळे मला रामाबद्दल कुणी सांगण्याचा प्रयत्न करू नये.
यावेळी आव्हाडांनी वाल्मिकी रामायणाचाही संदर्भ दिला. वाल्मिकी रामायणात सहा कांड आहे. त्यातील अयोध्या कांडात ५२ वा सर्ग १०२ श्लोक काय म्हणतो ते सर्वांनी वाचा. पण तरीही लोकभावनांचा आदर करून या विषयावर कदाचित कु्णाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. कुणाच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचा उद्देश नव्हता. मी केसेसना घाबरत नाही. मी जे सांगतो ते संदर्भासह सांगतो. पण, तरीही लोकभावनांचा आदर करणं महत्वाचं. लोकांना दुखवू नका हे शरद पवारांचं सांगणं आहे. त्यामुळेच मी खेद व्यक्त करत, असेही आव्हाड म्हणाले.