औद्योगिक वीजग्राहकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वागत सेल’, नववर्षापासून महावितरणची ग्राहकसेवा थेट औद्योगिक ग्राहकांच्या दारी
मुंबई, दिनांक १ जानेवारी २०२४ : नवीन वर्षाचे स्वागत करताना राज्यभरातील औद्योगिक ग्राहकांच्या दारी जाऊन तत्पर ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वागत सेल’ सुरु करण्यात येत आहे. याद्वारे औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी, इतर वीज सेवा देण्यासह बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येणार आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व सेवा कायम ठेवून नवीन वर्षानिमित्त ही अतिरिक्त सेवा सुरु करण्यात येत आहे. स्वागत सेल शी संपर्क साधल्यानंतर संबंधित कामासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी थेट ग्राहकांच्या दारी जाऊन कागदपत्रांची पुर्तता करण्यासह विनाविलंब सेवा देणार आहेत.
राज्यासह महावितरणच्या महसूलाचा औद्योगिक ग्राहक प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे या ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सद्यस्थितीत महावितरणकडून औद्योगिक वर्गवारीच्या दरवर्षी सुमारे १२०० नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. महावितरणच्या एकूण महसूलात औद्योगिक ग्राहकांचा तब्बल ४६ टक्के वाटा आहे. औद्योगिक ग्राहकांचे प्रमाण दरवर्षी सुमारे ३ टक्क्यांनी वाढत आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी औद्योगिक ग्राहकांसाठी स्थानिक पातळीवर स्वतंत्र सेवा देणारी यंत्रणा तयार करण्याची सूचना केली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात ¨स्वागत सेल°ची स्थापना करण्यात येत आहे व तसे परिपत्रक महावितरणतर्फे जारी करण्यात आले आहे. येत्या तीन दिवसांत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ¨स्वागत सेल° कार्यान्वित होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात किंवा महावितरणच्या मंडलस्तरावर अधीक्षक अभियंता यांच्या अखत्यारित ‘स्वागत सेल’ कार्यान्वित होईल. या सेलचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता तसेच व्यवस्थापक किंवा उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. नवीन वीजजोडणी, जादा वीजभार या मागणीसह वीजपुरवठा व बिलिंगच्या तक्रारी किंवा प्रश्न मांडण्यासाठी जिल्हानिहाय ¨स्वागत सेल° साठी एक समर्पित संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी राहणार आहे. त्याची माहिती औद्योगिक ग्राहक व संघटनांना विविध माध्यमातून कळविण्यात येणार आहे. यासह इतर माध्यमाद्वारे महावितरणकडे प्राप्त झालेली तक्रार किंवा मागणी ही ¨स्वागत सेल°कडे पाठविली जाईल व त्याद्वारे कार्यवाहीला विनाविलंब सुरवात होईल.
नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभारसंबंधी ‘स्वागत सेल’कडे मागणी नोंदविल्यानंतर संबंधित औद्योगिक ग्राहकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, शुल्क आदींची माहिती दिल्या जाईल. दोन कार्यालयीन दिवसांत कागदपत्रांची पुर्तता, ऑनलाइन अर्ज व प्रक्रिया शुल्क भरण्याची कार्यवाही महावितरणकडून ग्राहकांच्या दारी जाऊन केली जाईल. त्यानंतर लगेचच स्थळ पाहणीच्या तांत्रिक अहवालानुसार फर्म कोटेशन देण्यासह नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु होईल. यासोबतच वीजसेवा किंवा बिलिंगच्या प्राप्त तक्रारींचे सेवेच्या कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत किंवा त्यापूर्वीच निराकरण करण्यात येणार आहे.
औद्योगिक ग्राहकांसाठी महाराष्ट्र शासनाने ‘मैत्री पोर्टल’ कार्यान्वित केले असून त्याद्वारे महावितरणला नवीन वीजजोडणीचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध होतात. तसेच महावितरणच्या स्वतंत्र पोर्टलद्वारे औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराच्या मागणी अर्जासह कागदपत्रे अपलोड करणे, अंदाजपत्रकीय शुल्काचा भरणा करणे, टेस्ट रिपोर्ट, करारनामा अपलोड करणे, अर्जाची सद्यस्थिती जाणून घेणे तसेच टोल फ्री संपर्क क्रमांक, ‘ऊर्जा’ चॅट-बोट, एक क्वेरी फॉर्म आदी सेवा उपलब्ध आहे. यासोबतच आता ‘स्वागत सेल’मुळे प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक ग्राहकांना मिळणारी ग्राहकसेवा नवीन वर्षापासून आणखी गतिमान होणार आहे.