विरोधकांच्या छाताडावर बसून राम मंदिर बांधत आहोत – देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका
पुणे, २६ डिसेंबर २०२३: “भाजप सरकार आल्यास राम मंदिर बनविण्याबरोबरच ३७० कलम हटविण्याचे स्वप्न अटलबिहारी वाजपेयी यांनी पाहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते पूर्ण केले. तेव्हा विरोधक वाजपेयी यांना मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नहीं बताएँगे’ असे हिणवायचे. आता विरोधकांच्या छाताडावर बसवून राम मंदिर बनविण्यात आले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिराच्या निर्मितीला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला.
संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे व प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी यांना फडणवीस यांच्या हस्ते ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी उच्चव तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सिंबायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ
माशेलकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, खासदार प्रकाश जावडेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, “वाजपेयी यांनी जगाचा विरोध झुगारून अणुचाचणी घडवून आणली. त्यामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी भारतावर निर्बंध लादले, मात्र वाजपेयी झुकले नाहीत. अखेर जगाने निर्बंध मागे घेतले. वाजपेयी अर्थतज्ज्ञ नव्हते, परंतु त्यांनी गावोगावी रस्त्यांचे जाळे निर्माण करून अर्थव्यवस्थेला बळकटी दिली.”
डॉ. प्रभा अत्रे यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले की, “त्यांनी शास्त्रीय गायन प्रेक्षकांपर्यंत फक्त पोचविले नाही, तर आपल्या गायनातून श्रोत्यांना गाण्याची अनुभूती घडविली. त्यांना हा पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे.’
भारतरल अरन बिहारी वाजपे जन्मशताब्दी वर्ष डॉ. अत्रे म्हणाल्या, “हाताला
दुखापत झाल्याने सवाई गंधर्व महोत्सवाला जाता आले नाही, मात्र वाजपेयी यांच्या नावाचा पुरस्कार मिळतो तेव्हा त्याचे मूल्य वेगळेच असते. माझ्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी त्यांनी पुस्तकावर दिलेली स्वाक्षरी पाहून आजही मला त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित आठवते.”
डॉ. चौधरी म्हणाले, “इथेनॉल हे स्वदेशी इंधन असल्याने वाजपेयी यांनी या इंधनाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाला. हा माझ्यासाठी चांगला योग आहे.”
मोहोळ यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.