“सरकार मराठा समाजाला लॉलीपॉप देणार”, विजय वडेट्टीवारांची टीका

नागपूर, २१ डिसेंबर २०२३ ःमराठा आरक्षणाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु तेथे अपयश आले तर आरक्षणासाठी पुन्हा एकदा कायदा केला जाईल. त्यासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (१९ डिसेंबर) विधानसभेत केली. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा, धनगर आरक्षणाचा विषय अधांतरी आहे. ते म्हणतात की आम्ही फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊ. परंतु, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. परिणामी आचारसंहितेत तो विषय मार्गी लागणार नाही. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठा समाजाला लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न सरकार करतंय. लॉलीपॉपशिवाय दुसरं काही नाही. आरक्षण देण्याची नियत सरकारमध्ये नाही. ओबीसी समाजासाठी व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी विशेष काही करण्याची यांची मानसिकता नाही”, असाही घणाघात त्यांनी केला.
मराठा आरक्षण मिळालं नाही तर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकार, मुख्यमंत्री आणि जरांगे हे बघून घेतील. हा त्यांचा प्रश्न आहे, त्यात आम्हाला पडण्याची गरज नाही.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभेत सर्व पक्षीय ७४ सदस्यांनी सुमारे १७ तास या प्रस्तावावर आपली भूमिका मांडली. त्यानंतर मराठा, इतर मागास प्रवर्ग आणि धनगर आरक्षणाबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिकेच्या माध्यमातून हे आरक्षण टिकविण्यासाठी एक खिडकी उघडली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर हे आरक्षण टिकविण्यासाठी सरकार प्रभावी बाजू मांडेल. परंतु तेथे अपयश आले तर आरक्षणासाठी पुन्हा एकदा कायदा केला जाईल. त्यासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप