अफजलखानाच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण म्हणजे ‘लँड जिहाद’च -सुधीर मुनगंटीवार

पुणे, २० डिसेंबर २०२३ : “अफजलखानाच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण म्हणजे ‘लँड जिहाद’ होता. हे अतिक्रमण म्हणजे अफजलखानाचे उदात्तीकरण होते, अफजलखानाचे वंशज जिवंत असल्याचे पुरावे होते. त्यामुळे हे अतिक्रमण दूर केले”, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला, तो दिवस म्हणजे शिवप्रताप दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “औरंगजेब किंवा अफजलखानाकडे काही लोक विशिष्ट धर्माचे म्हणून पाहतात. ते कोणत्याही धर्माचे नव्हते, त्यांचा धर्म फक्त राक्षसीच होता. आम्ही देखील कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्ही हा देश जातीच्या आधारावर नाही, तर सदाचारावर चालवतो”, असे मुनगंटीवार म्हणाले. “छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात येणारच”, असे आश्वासनही त्यांनी दिले.

याप्रसंगी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त), भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, शहराध्यक्ष धीरज घाटे, कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद एकबोटे आदी उपस्थित होते. यावेळी ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जीवा महाले पुरस्कार’ विष्णु शंकर जैन यांना, ‘पंताजी गोपीनाथकाका बोकील पुरस्कार’ अ‍ॅड. निलेश आंधळे यांना, ‘हिंदुत्व शौर्य पुरस्कार’ आमदार महेश लांडगे व त्यांच्या परिवाराला आणि ‘मातृत्व पुरस्कार’ स्वाती मोहोळ यांना प्रदान करण्यात आला. ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे हेमंत जाधव आणि त्यांच्या चमूचा विशेष सन्मान करण्यात आला.

“शिवप्रताप दिनाचा उत्सव संपूर्ण देशभरात आणि लाल किल्ल्यावर देखील साजरा झाला पाहिजे”, अशी मागणी मिलिंद एकबोटे यांनी प्रास्ताविकात केली. शाहीर कामथे यांनी सहकाऱ्यांसह पोवाडा सादर केला. व्याख्याते सौरभ कर्डे यांनी शिवप्रताप दिन प्रसंगावर व्याख्यान दिले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप