“पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घ्या” – मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला झापले

मुंबई, १३ डिसेंबर २०२३ : पुणे लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने १० महिन्यात काहीच का हालचाली केल्या नाही, खासदारांच्या निधनानंतर एवढ्या महिने जागा रिक्त ठेवणे अयोग्य, लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणूक अद्याप झाली नाही. त्याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला झापले.

पुणे लोकसभेच्या या पोटनिवडणुकीसाठी पुणे भाजपमध्ये अनेक जण इच्छुक असल्याचे समजतेय. त्यात स्वरदा बापट यांच्यासह शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी अशी भाजपकडे इच्छुकांची मोठी फौज आहे. मात्र यातून एकाची निवड करणं सोपं नाही. त्यामुळे भाजपचं नेतृत्व यावर बोलण्याचं टाळत आहे. कसब्यात उमेदवार चुकल्याने भाजपला हक्काचा मतदारसंघ गमवावा लागला. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपला खूप विचार करुन निर्णय घ्यावा लागणार आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही तू तू मैं मैं

दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये देखील ही जागा लढवण्यावरुन तू तू मैं मैं पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्ष कॉंग्रेसकडून लढवण्यावरुन येणारी ही जागा आम्हीच लढवणार असं कॉंग्रेस नेते म्हणत आहे. तर पुणे शहरात आमची ताकद वाढल्याने ही आम्हाला मिळायला हवी, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करताना दिसत आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात आली असून सत्ता न मिळाल्यास ती अस्तित्वात राहणार नाही, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका  कधी ?
पुणे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे गिरीश बापट यांच्या निधनानंतर आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघाने काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघाच्या जागा रिक्त होत्या. त्यानंतर काही महिन्यात दोन्ही मतदार संघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता होती. पण जवळपास दहा महिन्यानंतरही निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल झाली नाही. त्यामुळे या दोन्ही जागा येत्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता होती. पण आज मुंबई हायकोर्टाने पुण्याची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश दिलेत. गिरीश बापट यांचं २९ मार्च रोजी निधन तर बाळू धानोरकर यांचं ३० मे रोजी निधन झालं होतं. १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ ला संपत आहे. मात्र तरी पोटनिवडणुकीची शक्यता नाही आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप