स्वामी गोविंददेवगिरी यांचा धक्कादायक दावा; राम मंदिर नेस्तनाबूत करण्याचे टुकडे टुकडे गँगचे मनसुबे

पुणे, ११ डिसेंबर २०२३: अयोध्येतील राम मंदिर निर्माण होत असताच जुनी मंदिर ज्या पद्धतीने नेस्तनाबूत केली. त्याच प्रमाणे राम मंदिराबाबातही काही तरी करता यावं असे मनसुबे तुकडे तुकडे गॅंग सारख्या मनोवृत्तीच्या काही मंडळीची आहेत. त्यासाठी हिंदूची जरब निर्माण होणे आवश्‍यक आहे, असे वक्तव्य श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी केले.

सौदामिनी हॅनलून्सतर्फे अयोध्येतील श्रीरामासाठी वस्त्र तयार केले जात आहेत. यामध्ये भाविकांचा हातभार लागावा यासाठी १० ते २२ डिसेंबर या कालावधीत ‘दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रम आयोजित केला आहे. याचे उद्‍घाटन रविवारी (ता.१०) झाले. तसेच अनघा घैसास लिखित ‘राम जन्मभूमीचे रामायण’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी गोविंद देव गिरी बोलत होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

गोविंद देव गिरी म्हणाले, ‘‘अयोध्येत फक्त मंदिर बांधून चालणार नाही अशा यापूर्वी पद्धतीची मंदिर पुन्हा पुन्हा का तोडली गेली? याची कारण मीमांसा होणे आवश्यक आहे. हिंदूंच्या मानचिन्हांकडे कोणाचीही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होऊ नये. यासाठी शक्ती, सक्रियता आणि सावधानता हे तीन तत्त्व आवश्‍यक आहेत. हिंदू समाजात जागृती होण्यासाठी दो धागे श्रीराम के लिए हा कार्यक्रम आवश्यक आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी न्यायालयातून न्याय मिळाला. पण तेव्हाच्या राजकारण्यांकडे न्यायालयात योग्य बाजू मांडण्याची इच्छाशक्ती नव्हती. ही राजकीय इच्छाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवली. रक्तपात न होता अयोध्येत राम मंदिर उभे राहात आहे हा आपल्या सामुहिक शक्तीचा विजय आहे.’’
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘राम मंदिराच्या उभारणीसाठी लोकचळवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून लोकचळवळ उभी राहिली, न्यायालयानेही निर्णय देताना लोकभावना लक्षात घेतली. हातमागावर काम करणाऱ्या कारागिरांना दिवाळीत १५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.

भय्याजी जोशी म्हणाले, ‘‘२०१३ ते २०२४ या कालावधीत हिंदू धर्माबद्दल आत्मीयतेचे विषय सोडविण्यास प्रारंभ झाला. भारतात लक्षावधी रामाची मंदिरे आहेत. तेथे पूजाअर्चा चालते. पण अयोध्येतील मंदिर हे राष्ट्र मंदिराचे काम असून, रामाच्या सेनेकडूनच हे मंदिर उभारले जाणार आहे.

स्मृती इराणी आल्या अन् गेल्या

मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी मोठी गर्दी होईल असे गृहित धरून मैदानात खुर्च्या टाकल्या होत्या. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रमासाठी पुण्यात आल्या. त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील सौदामिनी हॅंडलून्स येथे ‘दो धागे श्रीराम के लिए’ या उपक्रमांतर्गत श्रीरामासाठीच्या वस्त्रांसाठी धागे विणले. त्यानंतर त्या कार्यक्रम स्थळी आल्या. पण यावेळी या ठिकाणी तुरळक उपस्थिती होती. त्या काही वेळ तेथे थांबून मुंबईला जाण्यासाठी रवाना झाल्या. दरम्यान स्मृती इराणी गेल्यानंतर बहुतांश खर्च्या रिकाम्या होत्या पण नियोजनानुसार कार्यक्रम पार पडला. याबाबत आयोजक अनघा घैसास म्हणाल्या, ‘‘श्रीरामाच्या मूर्तीचे वस्त्र विणण्याचे काम माझ्याकडे आले आहे. हे पुण्यांच्या कामामध्ये लाखो हात लागावेत यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. स्मृती इराणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन लगेच जाणार होत्या हे यापूर्वीच ठरले होते. वस्त्र विणण्याच्या ठिकाणी मोठी गर्दी आहे, कदाचित दोन्ही कार्यक्रम एकाचवेळी ठेवल्याने इकडे गर्दी नसावी. पण गर्दीमुळे स्मृती इराणी गेल्या नाहीत.