मलिक प्रकरणात भाजप फडणवीसांच्या पाठीशी – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका

नागपूर, ८ डिसेंबर २०२३: आमदार नवाब मलिक यांच्यासंदर्भात जनतेला अपेक्षित भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून मांडली असून,मलिक यांच्यावर देशद्रोह्यांना समर्थन केल्याचा आरोप आहे त्या विरोधातील ती भूमिका आहे. त्याचा वैयक्तिक राजकारणाशी काहीही संबंध नाही. भाजपाचे संपूर्ण कॅडर फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे’, असे ठाम मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
बावनकुळे म्हणाले, देशद्रोहासंदर्भात न्यायालयाने मलिक यांच्यासंदर्भातील घेतलेली भूमिका पाहता हे पत्र जाहीरपणे समोर आले. सध्या ते वैद्यकीय जामीनावर असले तरी ते पूर्णत: आरोपमुक्त झालेले नाहीत. त्यांना आरोपमुक्त केले तर त्यांना सत्तेत घेण्यास भाजपाचा विरोध असणार नाही. देशहिताच्या मुद्द्यावर महायुतीत तडजोड करणार नाही. अजित पवार प्रगल्भ नेते आहेत. ते फडणवीस आणि १४ कोटी जनतेच्या भावनांचा आदर करतील, अशी अपेक्षा आहे.’

आमचे लक्ष्य ५१ टक्के जागा
शिंदे गटाने ठाण्यात काही जागावर दावा ठोकला आहे, याबाबत बावनकुळे म्हणाले,‘जो पक्ष यापूर्वी ज्या जागेवरून जिंकला आहे ती जागा त्यांचीच आहे. पण, त्याशिवाय कोण कुठून लढणार याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. भाजप आणि इतर सर्व सहकारी पक्ष मिळून तयार झालेल्या महायुतीचे लक्ष्य ५१ टक्के जागा जिंकण्याचे आहे. त्यामध्ये आमची गरज पडल्यास आम्ही सहयोगी पक्षांना मदत करू. जिथे आम्हाला सहयोगी पक्षांची मदत लागेल तिथे ते करतील. अद्याप कुठल्याही स्वरूपाचे जागावाटप झालेले नाही.’

कांदा निर्यातबंदीवर लवकरच निर्णय
कांदा निर्यातबंदी संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. ते सकारात्मक आहेत. लवकरच या मुद्द्यावर तोडगा निघेल, असे सुतोवाचही बावनकुळे यांनी केले.