पुढच्या आधिवेशनासाठी चहापान ऐवजी पानसुपारी कार्यक्रम ठेवणार – अजित पवारांचा विरोधांवर हल्लाबोल

नागपूर, ६ डिसेंबर २०२३: राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षआने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. आता पुढच्या वेळी विरोधकांसाठी पान सुपारी ठेवण्याचा आमचा विचार आहे, असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला.

उद्यापासून सुरू होत असलेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. राज्यात दुष्काळ, पाणीटंचाई आणि अवकाळी संकट असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार सुस्त आहे. अवकाळीचे चटके शेतकरी भोगत असतांना चहापान कार्यक्रमास हजेरी लावणं हा संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांप्रती द्रोह ठरेल, असं म्हणत चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.

याबाबत पत्रकार परिषद बोलतांना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला आहे. पण चहापान हे निमित्त असतं. त्यानिमित्त चर्चा करून कोणत्या विषयाला वेळ दिला पाहिजे, कोणता विषय जास्त महत्वाचा आहे, यावर बोलणी होत असते. मात्र, ते आले नाहीत. त्यामुळे पुढच्या वेळी विरोधकांसाठी पान सुपारीचा कार्यक्रम ठेवण्याचा आमचा विचार आहे.
ते म्हणाले, या अधिवेशनात विदर्भातील आणि राज्यातील अन्य प्रश्नांना प्राधान्य दिलं जाईल. जे पक्ष सत्तारूढ आणि विरोधी पक्षाकडून मांडले जातील, त्यावर सकारात्मक चर्चा करून प्रश्न सोडवले जातील. पुरवण्या मागण्या मी सादर करणार आहे, असंरी अजित पवार म्हणाले.

पुढं बोलतांना अजित पवार म्हणाले, विदर्भात कापूस, सोयाबीन, वाटाणा, संत्रा यांचे मोठे नुकसान झाले आहे. आपण १ लाख २० हजार कोटी रुपयांचे कर्ज काढू शकतो, हे प्रमाण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. असं असलं तरी ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१३ मध्ये जीएसडीपीचे प्रमाण १६.३३ होते. २०२३-२४ मध्ये ३८ लाख कोटी इतंक होणार आहे. ही मोठी उपलब्धी असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी होणार असल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्यात सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून यंदाचं अधिवेशन गाजणार असल्याचंही बोललं जातं.