पक्ष सोडून गेले त्यांचा पराभव होतो – शरद पवारांचा अजित पवार गटावर हल्ला

पुणे, २ डिसेंबर २०२३: १९७८ ला निवडणुका झाल्यानंतर मी परदेशात गेलो. पण मी परत येईपर्यंत ६० आमदार दुसऱ्या पक्षात गेले आणि सहा जणच शिल्लक राहिले होते. पण पुढच्या निवडणुकीत त्या ६०पैकी ५१-५२ लोक पराभूत झाले होते. आपण संपलो आहोत असे वाटत असताना आम्ही जनतेत जाऊन नवी पिढी उभी केली. त्यामुळे माझी चिंता करू नका, अशी स्थिती पुन्हा एकदा महाराष्ट्रात बघायला मिळेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

पुण्यात निसर्ग मंगल कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पवार यांनी मार्गदर्शन केले. शरद पवार यांनी तरुण पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पक्षातील दुफळीमुळे खचून न जाता तुम्हाला एक चांगली संधी आली आहे असा विश्‍वास दिला.

पवार म्हणाले, ‘‘६० आमदार सोडून गेल्यानंतर नंतरच्या निवडणुकीत ७६ आमदार निवडून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देऊ शकलो होतो. त्यामुळे कोणी गेलं तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही. आपण सामान्य लोकांमध्ये जाऊन आपली भूमिका मांडून त्यांचा पाठिंबा मिळवला. ती अवस्था नक्की महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने बघायला मिळाली आहे.

पक्षात जे काही घडलं त्याची चिंता करू नका, यानिमित्ताने संघटनाही स्वच्छ होत आहे. नवीन लोकांना संधी मिळत आहे. जर युवकांची संघटना आपण मजबूत केली तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक मोठी फळी मोठ्या मताने निवडून येईल. ते ते राज्य चालवतील आणि लोकांचे प्रश्न सोडवतील. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन तुमचा जनसंपर्क वाढवा. जे पक्ष सोडून गेले आहेत, माझ्यावर टीका करत आहेत, त्यांचा फारसा विचार करू नका. जागरूक सामान्य माणूस हा या देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत परिवर्तन करण्याची धमक आहे, असे आवाहन पवार यांनी केले.